Monday, March 23, 2026
Homeसातारासातारा राजद्रोहाचा (देशद्रोहाचा) खटला - १८५७

सातारा राजद्रोहाचा (देशद्रोहाचा) खटला – १८५७

ईस्ट इंडिया (इंग्रज) कंपनी सरकार विरुध्द सैन्याची जमवाजमव करणे , बंदुकीच्या गोळ्यांचे उत्पादनं करणे , ईस्ट इंडिया कंपनी सरकार विरोधी जनमानस भडकावणे , ईस्ट इंडिया कंपनी सरकारची शस्त्रास्त्राची ठिकाणे लुटणे ,  थोरल्या प्रतापसिंह महाराजांची गादी पुन्हा स्थापित करणे व त्यांच्या दत्तक पुत्र याला गादिवर बसवणेचा प्रयत्न करणे , ईस्ट इंडिया कंपनी सरकारच्या कारागृहात असलेल्यांना बाहेर काढणे या सगळ्यासाठी कट रचणे या आरोपावरून १७ जणांविरोधी खटला भरला होता. हा कट रंगो बापुजी गुप्ते यांच्या नेतृत्वाखाली रचला होता. या कटामध्ये सर्वसामान्य सामिल झाले होते. रामोशी, मातंग , शेणवी , कायस्थ प्रभु , सोनार , कुणबी आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या खटल्याची सुनावणी दि २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर १८५७ या कालावधीत तीन जणांच्या न्यायदान मंडळपूढे झाली. चार्लस फोर्ब्स यांचे अध्यक्षतेखालील या मंडळाचे कर्नल जी. माल्कम व कॅप्टन जेम्स रोझ हे अन्य दोन सदस्य होते. कॅप्टन जेम्स रोझ हे त्यावेळी सातारचे जिल्हाधिकारी अर्थात कलेक्टर होते. या मंडळाचे पुढे या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर सातारा राजद्रोहाच्या खटल्यात १७ जणांना दोषी ठरवण्यात आले. सर्वजणांना देहदंडाची शिक्षा देण्यात आली व त्यांची सर्व संपत्ती सरकार जमा करण्यात आली.विशेष म्हणजे या खटल्यात सरकारने १७ साक्षीदार तपासले . देहदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी तीन प्रकारे करण्यात आली. ५ जणांना फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली. ६ जणांना बंदुकीच्या गोळ्यांनी मारण्याची शिक्षा सुनावली. तर ६ जणांना तोफेच्या तोंडी देण्याची शिक्षा झाली . या शिक्षेची अंमलबजावणी दि. ८ सप्टेंबर १८५७ रोजी सातारा जवळील गेंडामाळ येथे करण्यात आली. तेथे पूर्वी वडाचे झाड होते म्हणूनच या ठिकाणाला फाशीचा वड म्हणतात. अर्थात वडाच्या फांद्यांना फाशी देण्यात आलेले नाही हे अनेक संशोधनाच्या सिद्ध झालेले आहे. परंतु काही जण वडाच्या फांद्याला फास अडकून फाशी दिले असे सांगतात पण हे पूर्णतः चुकीचे आहे. अशाच माणसांना काही जण इतिहासकार म्हणतात पण असा चुकीचा इतिहास सांगितला जाऊ नये.

देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सतरा जणांमध्ये

१ ) नारायण ( नाना ) बापू पावसकर ( सोनार ) .

२) मुन्नाजी उर्फ बापू ( नारायण) बाबर ( भांदिर्गे )

३) केशव निळकंठ चित्रे ( रंगो बापूजी गुप्ते यांचे मेव्हणे )

४) शिवराम मोरेश्वर कुलकर्णी ( बहुश्रुत )

५) सखाराम बळवंत चव्हाण

६) रामजी बापूजी चव्हाण उर्फ रामसिंग

७) बाब्या रंगू ( कांगु ) शिरतोडे

८) बाब्या नाथ्या गायकवाड ( मांग )

९) येशा नाथ्या गायकवाड ( मांग )

१०) नाम्या नायकू चव्हाण

११) शिव्या सोमाजी पाटोळे

१२) पार्वती विठोजी ( गणेश ) साळोखा

१३) विठ्ठल कोंडी वाकनीस

१४) गणेश सखाराम कारखानीस

१५) पालटू येसू घाटगे

१६) सीताराम रंगराव गुप्ते ( रंगो बापूजी गुप्ते यांचे चिरंजीव )

१७) नाना उमाजी मुडके

यांचा समावेश आहे .

या हुतात्म्यांना देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली त्या घटनेला आज १६७ वर्षे झाली.

कटाचे सूत्रधार म्हणून ज्यांच्यावर आरोप होता ते रंगो बापूजी गुप्ते हे मात्र अखेरपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीच्या सरकारला सापडले नाहीत.

Satara Treason Case – 1857

अर्थात सातारा राजद्रोहाचा खटला म्हणून या केसला ओळखले जाते.

या हुतात्म्यांना क्रांतिकारक अभिवादन .

– विजय मांडके ,

सातारा

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments