सातारा नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मतदार यादी. परंतु हीच यादी आज सातारकरांसाठी मोठ्या चिंतेचा विषय ठरत आहे. कारण एकीकडे लोकशाहीची पायाभरणी असलेली मतदार यादी काटेकोर, अचूक आणि पारदर्शक असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र सातारा शहरातील मतदार यादीत उघड उघड चुका, विसंगती आणि गोंधळाचे नमुने मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. हीच सदोष यादी आता नागरिकांमध्ये निवडणूक प्रक्रियेबद्दल अविश्वास निर्माण करत आहे.
लोकशाहीमध्ये मतदार यादी म्हणजे निवडणुकीचे हृदय. हे हृदयच जर त्रुटीयुक्त असेल, तर त्यावर आधारित होणारी निवडणूक किती वैध ठरणार? हा मोठा आणि गंभीर प्रश्न साताऱ्यात आज उपस्थित झाला आहे.
घर एक वार्ड दोन! पत्ता एक नावे वेगवेगळी! हा कसला कारभार?
शहरातील अनेक भागांमध्ये एकाच घरातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या वार्डात टाकल्याची धक्कादायक उदाहरणे समोर आली आहेत. पहिल्या मजल्यावर राहणारा मतदार एका वार्डात, तर खाली राहणारा मतदार दुसऱ्याच वार्डात. शेजारी राहणारे नागरिक वेगवेगळ्या वार्डात. एकाच घरातील चार सदस्यांपैकी दोन मतदारांची नावे असताना उरलेल्या दोघांची नावे आवश्यक यादीतून गायब—अशी हास्यास्पद परिस्थिती अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित करते.
मतदार यादीतील हा गोंधळ चुकीच्या पत्त्यांपुरता मर्यादित नाही. अनेक घरे, सोसायट्या आणि वसाहतींमध्ये हा कारभार मोठ्या प्रमाणात दिसत आहे. ही केवळ एक-दोन उदाहरणे नव्हेत, तर संपूर्ण शहरभर पसरलेला अजब-गजब प्रशासकीय गोंधळ आहे.
गेंडामाळ—अंजली कॉलनी सुयोग कॉलनी ‘वारे प्रशासन’चा पुरावा ?
सातारा नगरपालिकेच्या हद्दीत प्रथमच सामील झालेल्या गेंडामाळ परिसरातील अंजली कॉलनी, अर्कशाळा नगर आणि सुयोग कॉलनी भागांमध्ये तर या चुका डोळे दिपवणाऱ्या आहेत. येथे नव्याने समाविष्ट झालेल्या नागरिकांना पहिल्याच निवडणुकीत अशा भोंगळ पद्धतीच्या मतदार यादीला सामोरं जावं लागत आहे.
या भागांत असे अनेक किस्से समोर आले एका घरातील लोकांचे पत्ते सारखे असूनही नावे वेगवेगळ्या वॉर्डात.काही नागरिकांची नावे मतदार यादीत आलीच नाहीत. तर काहींची नावे दोन वेगवेगळ्या वॉर्डात आढळली.जोडप्यांतील एकाला मत अधिकार आणि दुसऱ्याला नाही—अशीही उदाहरणे दिसली आहेत.ही परिस्थिती केवळ नागरिकांसाठी त्रासदायक नाही, तर निवडणूक प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवरच प्रश्नचिन्ह उभे करते.
विधानसभा यादीत सगळं ठीक, मग नगरपरिषद यादीत गोंधळ का?
विधानसभा निवडणुकांमध्ये जी मतदार यादी शाबूत, अचूक आणि सुरळीत होती, तिच्यात एवढा गोंधळ नगरपरिषद निवडणुकीत कसा झाला? कोणत्या कारणासाठी जानूनबुजून किंवा दुर्लक्षामुळे ही नावे इकडे-तिकडे हलवण्यात आली?
काही नागरिकांची मतदार नावे हटली?
काहींच्या पत्त्यात चुकीची विभागणी?
वार्ड पुनर्रचनेचे सबब देत चुका झाकायचा प्रयत्न?
निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन आणि नगरपरषदेची यंत्रणा या सर्वांकडून या प्रश्नांची उत्तरे नागरिकांना मिळायला हवीत. निवडणूक ही फक्त एक दिवसाची प्रक्रिया नसते; तिच्या आधी वर्षभर चालणारी तयारी अचूक असणे अनिवार्य आहे. पण साताऱ्यात ही तयारीच कमी पडली असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
निवडणूक यंत्रणेवर नागरिकांचा विश्वास डळमळीत
मत म्हणजे नागरिकांची ताकद. त्या ताकदीचा योग्य वापर व्हावा यासाठी मतदार यादी ही चूकविरहित असणे अत्यावश्यक आहे. परंतु सध्याची स्थिती अशी की—
नागरिकांना स्वतःचा वार्ड क्रमांक कळत नाही,घरातच दोन मतदारांसाठी वेगळे मतदान केंद्र,काही नावे संपूर्णपणे गायब,तर काहीांना दोन-दोन नोंदी.
ही केवळ गफलत नाही; हा प्रशासनातील गंभीर दोष आहे. अशा यादीवर आधारित झालेली निवडणूक योग्य आणि पारदर्शक मानली जाऊ शकते का? नागरिकांचा विश्वास टिकवणे ही जबाबदारी प्रशासनाची आहे. पण आज तो विश्वासच हादरला आहे.
लोकशाहीचा पाया कमकुवत—पेपरवर ‘परफेक्ट, प्रत्यक्षात ‘फेक’
कागदोपत्री सर्व काही व्यवस्थित दाखवून प्रत्यक्षात जबाबदारी ढकलणे ही राज्यकर्त्यांची आणि प्रशासकीय यंत्रणेची सवयच झाली आहे. नागरिकांची सेवा, सुविधा, रस्त्यांचे प्रश्न, पाणीपुरवठा—या सर्व गोष्टींमध्ये आधीच भोंगळ कारभार दिसत असताना मतदार यादीतही अशीच बेफिकिरी का?जेव्हा मूलभूत नागरी सुविधा देण्यात प्रशासन अपयशी, तेव्हा निवडणुकीत पारदर्शकता कशी येणार?
नागरी सुविधा मिळण्यात बोंबाबोंब, कर मात्र वेळेवर वसूल. पण मतदानाचा हक्क वापरायचा आला, तर नागरिकांना चुकीच्या यादीचे ओझे वाहावे लागते!ही भरपाई कशी होणार? जबाबदार कोण?या प्रचंड आणि गंभीर त्रुटींची जबाबदारी कोण घेणार? मतदारांच्या नावांवर चुकीचे निर्णय करणारे अधिकारी?मतदार यादी तयार करताना काटेकोरपणा न दाखवणारे कर्मचारी? यादी पुनरावलोकनाच्या सार्वजनिक सुनावणीत बेजबाबदार हजेरी?किंवा हे सर्व ‘सिस्टममधील’ दोष म्हणून झाकून टाकायचे? निवडणूक आयोगाने आणि जिला प्रशासनाने त्वरित चौकशी करणे आवश्यक आहे. चुकीच्या नावे दुरुस्त करणे, यादी अद्ययावत करणे आणि नागरिकांना अचूक माहिती देणे ही त्यांची जबाबदारी आहे.
‘अशी ही साताऱ्याची तऱ्हा’नागरिकांचा रोष स्वाभाविक
सातारकरांची भावना स्पष्ट आहे—
हा गोंधळ, ही बेपर्वाई, हा हलगर्जीपणा मान्य नाही.
मतदार यादी ही खेळण्याची वस्तू नाही. प्रत्येक नागरिकाचा मतदानाचा हक्क पवित्र आहे. त्या हक्काची अवहेलना म्हणजे लोकशाहीची अवमानना.
एका घरातील मतदार वार्ड 9 आणि वार्ड 10 मध्ये विभागणे,
लोकांना मतदानापासून दूर ठेवणे,
पुनर्रचनेच्या कारणाखाली प्रशासकीय चुकांचे आडोसे करणे—
हे सर्व प्रकार कधीच स्वीकारार्ह नाहीत.
सातारला अचूकतेची, पारदर्शकतेची आणि जबाबदारीची गरज
सातारा ही ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची नगरी आहे. पण अशा अव्यवस्थित मतदार यादीमुळे शहराची प्रतिमा खराब होते. मतदार यादीतल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी तातडीने उपयोजना झाल्या पाहिजेत. नाहीतर या निवडणुकीची प्रामाणिकता प्रश्नांकित ठरेल.
लोकशाही मजबूत व्हावी—हे प्रशासन, निवडणूक आयोग आणि नागरिक सर्वांचे कर्तव्य आहे.
परंतु आज निवडणूक यंत्रणेलाच मोठे आव्हान सातारकरांनी समोर ठेवले आहे—
“विश्वास दाखवू, पण त्यासाठी तुम्ही विश्वासार्हता दाखवा.”



