सध्या रक्तचंदन हे दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. रक्तचंदनाची तस्करी या चित्रपटात दाखवण्यात आली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर कशा पद्दतीने त्याची विक्री केली जाते, यावर भाष्य करण्यात आले आहे. दरम्यान तब्बल अडीच कोटींचे रक्तचंदन सांगली पोलिसांनी जप्त केले आहे. ही कारवाई मिरज येथे करण्यात आली आहे. हे रक्तचंदन विदेशात तस्करी केले जाणार होते अशी शंका आहे. गेल्या पाच वर्षातील महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
कर्नाटकमधून तब्बल एक टन रक्तचंदन कोल्हापूरला नेले जात होते. या तस्करीची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी जकात नाक्यावर वाहने तपासण्यास सुरुवात केली. यावेळी महात्मा गांधी पोलिसांना एका टॅम्पोत हे रक्तचंदन सापडले. याप्रकरणी पोलिसांनी यासीन इनायत उल्ला खान यास अटक केली आहे. एक गाडी आणि रक्तचंदनसहित अडीच कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, या कारवाईमुळे आंतरराज्य टोळी उघडकीस आली आहे.
पोलिसांना अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. जकात नाक्यावर पोलीस आणि वनविभागाने यानंतर संयुक्त कारवाई करत सापळा रचला होता. यावेळी कर्नाटकमधून आलेले एक वाहन सापडले असून त्यातून एक टन चंदन मिळाले आहे. याची किंमत २ कोटी ४५ लाख ८५ हजार आणि १० लाखांचा टेम्पो असा एकूण २ कोटी ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महात्मा गांधी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीला अटक केली असून तपास सुरु असल्याची माहिती पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे.