Friday, August 8, 2025
HomeMain Newsशशी थरूर, राजदीप यांची सुप्रीम कोर्टात याचिका

शशी थरूर, राजदीप यांची सुप्रीम कोर्टात याचिका

प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांच्या ट्रॅक्टर रॅलीच्या दरम्यान झालेल्या हिंसाचारात एका शेतकर्याच्या मृत्यूची दिशाभूल करणारी बातमी ट्विट केल्याप्रकरणात देशद्रोहाचा गुन्हा लावण्यात आलेले काँग्रेसचे लोकसभा खासदार शशी थरूर, इंडिया टुडेचे पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मंगळवारी पत्रकार मृणाल पांडे, जफर आगा, परेश नाथ व अनंत नाथ यांनीही त्यांच्यावर दाखल झालेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

या सर्व पत्रकारांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीत एका शेतकर्याचा मृत्यू झाल्याचे दिशाभूल करणारे वृत्त ट्विट केले होते, त्यावरून या सर्व पत्रकारांवर व शशी थरूर यांच्यावर गुरगांव, बंगळुरू, नोएडा व मध्य प्रदेशातून विविध गुन्हे दाखल झाले होते. या सर्वांवर देशद्रोहा व्यतिरिक्त समाजात शत्रूत्व पसरवणे, सार्वजनिक शांततेला बाधा आणणे, गुन्हा षडयंत्र, धार्मिक भावनांना चिथावणी देणे असे गुन्हा दाखल केले गेले आहेत.

तक्रारदारांनी दावा केला की, ट्रॅक्टर रॅलीत नवन्रीत सिंह यांचा मृत्यू ट्रॅक्टर उलटून डोक्याला इजा होऊन झाला. पण या पत्रकारांनी नवन्रीत सिंह यांचा मृत्यू पोलिसांची गोळी लागून झाला असे ट्विट केले. पोस्टमार्टम अहवालातही नवन्रीत यांचा मृत्यू पोलिसांच्या गोळीने  झाला नाही असे निष्पन्न झाले होते. त्यामुळे अशा दिशाभूल ट्विटमुळे सामाजिक सौहार्द बिघडले असा दावा तक्रारदारांचा होता.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments