Sunday, March 1, 2026
HomeMain Newsविलासपूर दारूमय करण्याचा डाव? गजानन प्राईडमध्ये बेकायदेशीर बांधकामावर प्रश्नचिन्ह

विलासपूर दारूमय करण्याचा डाव? गजानन प्राईडमध्ये बेकायदेशीर बांधकामावर प्रश्नचिन्ह

विलासपूर हे नाव गेल्या काही वर्षांत विविध कारणांनी सतत चर्चेत राहिले आहे. कधी राजकारण, कधी विकासकामे, तर कधी दारूच्या दुकानांमुळे हा परिसर प्रसिद्धीच्या झोतात असतो. आता पुन्हा एकदा विलासपूरमध्ये नव्या दारूच्या दुकानाच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

सध्या विलासपूर परिसरात एक बियर शॉपी आणि एक दारूचे दुकान कार्यरत आहे. ग्रामपंचायतीच्या परवानगीनंतर ही दुकाने सुरू झाल्याचे सांगितले जाते. मात्र, आधीच दोन दुकाने अस्तित्वात असताना तिसऱ्या दुकानाची भर का पडत आहे, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. संपूर्ण विलासपूरच दारूमय करण्याचा काही राजकीय हेतू तर नाही ना, अशी शंका व्यक्त होत आहे.

गजानन प्राईडमध्ये बेकायदेशीर बांधकामाचा आरोप

विलासपूर येथील गजानन प्राईड सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ही प्रतिष्ठित संस्था Maharashtra Cooperative Societies Act, 1960 अंतर्गत नोंदणीकृत आहे. संस्थेच्या इमारतीत A, B, C आणि D असे चार विंग आहेत. A विंगमध्ये पूर्वाभिमुख दुकाने आहेत.

संस्थेच्या म्हणण्यानुसार, A विंगमधील १ व २ क्रमांकाच्या गाळ्यालगत संस्थेच्या मालकीच्या खुल्या जागेत विनापरवाना शेडचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या संदर्भात प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप सभासदांनी केला आहे.

तसेच संबंधित गाळ्याची अधिकृत नोंद नसल्याचे आणि आवश्यक कर-शुल्क भरले नसल्याचेही संस्थेचे म्हणणे आहे. हे बांधकाम पूर्णपणे बेकायदेशीर असून त्यामध्ये बियर बार सुरू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती संस्थेला मिळाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

महिला नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सदर व्यवसायासाठी सोसायटीची कोणतीही लेखी परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा दावा संस्थेने केला आहे. त्यामुळे परिसरातील महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांना त्रास होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दारूच्या दुकानांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त होत आहे.

आजपर्यंत दोन दुकाने अस्तित्वात असताना आणखी एक बार सुरू करण्यामागचा उद्देश काय? स्थानिक लोकप्रतिनिधी व स्वयंघोषित समाजसेवक याबाबत मौन का बाळगून आहेत, असा सवाल नागरिक करत आहेत.

प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी

या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर बांधकाम तात्काळ थांबवून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच संस्थेच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात संस्थेच्या संचालक मंडळाचा ठराव मंजूर करून त्याची प्रत तक्रारीसोबत जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

महिलांनी प्रभाग सभा घेऊन या बारविरोधात ठाम भूमिका घ्यावी आणि आवश्यक असल्यास मतदान प्रक्रिया पार पाडावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

विकासाच्या नावाखाली जर बेकायदेशीर बांधकामे आणि दारूची दुकाने वाढत असतील, तर तो विकास नव्हे तर सामाजिक ऱ्हास ठरेल. विलासपूरच्या भवितव्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांनी एकत्र येऊन पारदर्शक व कायदेशीर भूमिका घेणे ही काळाची गरज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments