सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना वन्यजीव बामणोली वनपरिक्षेत्रातील शासनाच्या २० हुन अधिक वनकर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्याचे वेतनच मिळाले नसून वरीष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांच्याकडून टोलवाटोलवीची उत्तरे मिळत असल्याने वन कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ अली आहे . लॉक डाऊनमुळे अनेकांच्या हाताचे रोजगारच गेल्याने अनेक चाकरमान्यांवर उपासमारीची वेळ आली असताना शासनाच्या वनकर्मचाऱ्यांवर कामकाज करूनही गेल्या तीन महिन्या पासून वेतनच मिळत नाही . त्यामुळे या वनकर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे . वनाधिकारी लक्ष देत नसल्याने हा प्रश्न निर्माण झाल्याचे समजते .
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना वन्यजीव विभागाचे बामणोली वनक्षेत्र हे अति दुर्गम म्हणून ओळखले जाते . या विभागातील कार्यक्षेत्र हे कोयना नदीच्या पलीकडे असून घनदाट जंगलांनी वेढलेले आहे . या जंगलात सर्व वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात असून या परिक्षेत्रातील कारगाव अंबवडे ,लामज ,म्हाळूगे ,शिंदी ,वलवण ,आकलपे आरव आदी अतिदुर्गम अनेक गावांचा समावेश होतो . या गावांमध्ये आपापल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणच्या गावांमध्ये वनकर्मचारी हे वास्तव्यास असून यामध्ये नवीन भरतीतील अधिक कर्मचारी आहेत ते विदर्भ मराठ्वाढा लातूर अशा परजिल्ह्यातील असून यात महिला वनकर्मचाऱ्यांचा हि समावेश आहे . मात्र आपल्या वेतनावर अवलंबुन असणाऱ्या या वन कर्मचाऱ्यांना लॉक डाऊन च्या प्रसंगात गेल्या तीन महिन्यापासून पगारच मिळाला नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे .
अनेक कर्मचाऱ्यांनी बँकांची कर्जे घेतली आहेत . कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी बँकांनी तगादा लावला असून बँकांचे व्याजही वाढत चालेले आहे . एकीकडे अडचणीच्या दुर्गम विभागामध्ये काम करायचे आणि त्याच भागात वास्तव्य करायचे बाजारपेठेकडे येण्यासाठी वेळेत लॉन्च मिळत नाही . वाहन मिळत नाही त्यामुळे राहत्या ठिकाणी महिनाभराचा बाजार एकदम भरावा लागतो . मात्र पगारच मिळत नसल्याने साहित्य खरेदी करता येत नाही . वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता ते टोलवाटोलवीची उत्तरे देऊन ते आपली जबाबदारी झटकत आहेत . शासनाने या कडे लक्ष देऊन तातडीने या कर्मचाऱ्यांचे वेतन द्यावे .