Friday, March 6, 2026
HomeMain Newsलसीकरणानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्टीकरण

लसीकरणानंतर मद्यपान केल्यास विपरीत परिणाम होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचे स्पष्टीकरण

देशभरात कोरोनाविरोधात लढण्यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींच्या वापराला परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, सर्वप्रथम आरोग्य सेवक, त्यानंतर सुरक्षा सेवक आणि ६० वर्षांवरील नागरिक आणि आता ४५ वर्षांवरील सर्वांना अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने कोरोनाची लस दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात लसीकरण आणि त्यानंतरच्या परिणामांविषयी अनेक प्रश्न आणि संभ्रम आहेत. त्यातील सर्वाधिक ‘चर्चेत’ असलेला प्रश्न म्हणजे कोरोनाची लस घेतल्यानंतर मद्यपान केल्यामुळे लसीचा प्रभाव कमी होतो का किंवा त्याचे आरोग्यावर काही विपरीत परिणाम होतात का? यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबतच काही तज्ज्ञ डॉक्टरांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे.

आरोग्य मंत्रालयाने कोरोनाची लस घेतल्यानंतर मद्यपान केल्यास त्यामुळे लसीचा प्रभाव कमी होतो, असा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नसल्याचे म्हटले आहे. पण, असे असले तरी लसीकरणानंतर मद्यपान केल्यास, आणि विशेषत: अती मद्यपान केल्यास, त्याचा परिणाम होऊ शकतो, असे काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या मत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

यासंदर्भात स्पष्टीकरण देताना मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टर किर्ती सबनीस यांनी म्हटले आहे कि, लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनांमध्ये मद्यपानाचा समावेश नसला, तरी लस घेतल्यानंतर किमान एक आठवडा तरी मद्यपान टाळायला हवे. त्याचबरोबर तुम्ही जर मद्यपान केलेच, तर ते नियंत्रणात असणे आवश्यक आहे. रोज मद्यपान तर टाळायलाच हवे, असे देखील त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पुढे डॉ. किर्ती सबनीस म्हणाल्या कि, जर जास्त प्रमाणात मद्यपान केले, तर लसीमुळे होणारे साईड इफेक्ट्स झाकले जाण्याचा धोका आहे. लस घेतल्यानंतर जर तुम्हाला अंगदुखी, त्वचेवर रॅशेस किंवा ताप असा काही त्रास होऊ लागला, तर मद्यपानामुळे तो जाणवणार नाही आणि त्यावर तातडीने उपचारांची आवश्यकता असली, तर ते करता येणार नसल्याचे डॉ. किर्ती सबनीस यांनी नमूद केले आहे.

तसेत, आपली प्रतिकारशक्ती देखील मद्यपानामुळे कमी होते हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही. सध्याच्या काळात तर हे फारच महत्त्वाचे आहे. सध्याच्या काळात तर सार्वजनिक ठिकाणी केले जाणारे मद्यपान टाळायलाच हवे. कारण त्यामुळे तुमचे मास्क, सॅनिटाझर, सोशल डिस्टन्सिंग याकडे दुर्लक्ष होऊ शकते, असं डॉ. सबनीस म्हणाल्या आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments