राहुल गांधी यांच्या हिंदू वक्तव्यावरून संसदेमध्ये खडाजंगी पहायला मिळाली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत अहिंसेचा देश असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना जे स्वत:ला हिंदू समजतात ते हिंसा, द्वेष परवणं आणि असत्य गोष्टी करत आहेत, असा टोला लगावला. तर संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक बोलणं गंभीर असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींवर केला. त्याला राहुल गांधींनी पलटवार करताना नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएस संपूर्ण हिंदू समाज नसल्याचं म्हटलंय.
काही लोक स्वत:ला हिंदू म्हणवतात त्यांना 24 तास हिंसाचार, हिंसाचार, हिंसाचार हवा असतो; द्वेष, द्वेष, द्वेष; खोटे, खोटे, खोटे बोलत राहा. अशी लोक मुळातच हिंदू नाहीत. त्यामुळे तुम्ही अजिबात हिंदू नाहीत. सत्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे असे हिंदू धर्मात स्पष्ट लिहिले आहे. सत्यापासून मागे हटता कामा नये, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.