Saturday, August 9, 2025
HomeMain Newsराजकीय पोस्ट नव्हे वेगळ्या कारणाने किरण मानेंना डच्चू, सहकलाकारांचा दावा

राजकीय पोस्ट नव्हे वेगळ्या कारणाने किरण मानेंना डच्चू, सहकलाकारांचा दावा

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो; या मालिकेतून काढून टाकल्यानंतर किरण माने चर्चेत आले आहेत. आपण किरण माने यांनी राजकीय भूमिका मांडल्यामुळे मालिकेतून काढल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर स्टार प्रवाहारवर जोरदार टीका देखील झाली. मात्र स्टार प्रवाहकडून या प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. मात्र मालिकेतील सहकलाकारांनी किरण माने यांना राजकीय भुमिकेमुळे नाही तर त्यांच्या चुकीच्या वर्तनामुळे मालिकेतून काढून टाकल्याचा दावा केला आहे. या कलाकारांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये  दावा केला आहे. स्टार प्रवाह या वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत किरण माने हे विलास पाटील हे पात्र साकारत होते. मात्र त्यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आपण सोशल मीडियावर भाजपविरोधात भूमिका मांडल्याने आपल्याला मालिकेतून काढून टाकल्याचे सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर किरण मानेंच्या समर्थनार्थ जोरदार ट्रेंड चालवला गेला. किरण मानेंनी भाजपाविरोधात भुमिका घेतल्यानेच त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचा आरोप करत हा सांस्कृतिक दहशतवाद आहे का?, असा सवाल उपस्थित करत राज्यातील काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही टीका केली होती. त्यानंतर किरण माने यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र त्या भेटीचा तपशील बाहेर आला नव्हता. मात्र आपण राजकीय भूमिका घेतल्यानेच आपल्याला मालिकेतून काढून टाकत असल्याचा आरोप किरण माने यांनी विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीतून केला. किरण माने यांना काढल्यानंतर मुलगी झाली हो या मालिकेचे शूटिंग सातारा जिल्ह्यातील ज्या गावात सुरू होते, तेथील ग्रामपंचायतीने शूटिंगला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता यानंतर या मालिकेत काम करणाऱ्या इतर कलाकारांनी किरण माने खोटे बोलत असल्याचा आऱोप केला आहे. “राजकीय भूमिका घेतल्याने मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचे किरण माने यांचे म्हणणे खोट आहे, तर त्यांनी केलेल्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे, असा दावा किरण मानेंच्या सहकलाकारांनी सांगितले. ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील विलास पाटील यांच्या मुलीचे पात्र साकारणाऱ्या दिव्या पुगांवकर म्हणाली, की, ” किरण माने हे माऊचे वडील विलास पाटील यांचे पात्र साकारत होते. मात्र कोणताही बाप आपल्या मुलीवर अशी शेरेबाजी करणार नाही, जशी शेरेबाजी किरण माने करत होते. याबरोबरच मालिकेत माऊच्या आईची भुमिका केलेल्या शर्वणी पिल्लई म्हणाल्या की, “मुळात राजकीय भूमिका मांडली “त्यामुळे किरण माने यांना मालिकेतून काढून टाकले ही बातमी त्यांनी पसरवली आहे. हा दावा मुळात खोटा आहे. किरण माने यांना त्यांच्या वर्तवणुकीमुळे मालिकेतून काढले आहे. प्रोडक्शन हाऊसने त्यांना याआधी तीनवेळा वॉर्निंग देण्यात आली होती. मात्र त्यांच्या वर्तनात बदल न झाल्यानेच त्यांना मालिकेतून काढून टाकले आहे.” दरम्यान मालिकेचे चित्रीकरण सुरू असलेल्या गुळुंब ग्रामपंचायतने प्रॉडक्शन हाऊसला पत्र लिहीत चित्रीकरणाची परवानगी नाकारली होती. त्या पत्रावर सरपंचाची सही असल्याने ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. मात्र गुळूंब ग्रामपंचायतीला प्रोडक्शन हाऊसने स्पष्टीकरण दिल्यानंतर त्यांनी चित्रीकरणाला परवानगी दिलेली आहे. चित्रीकरण अजिबात थांबले नाही, अशी माहितीही यावेळी शर्वरी पिल्लई यांनी दिली. या मालिकेत विलास पाटील यांच्या आईचे पात्र साकारणाऱ्या सविता मालपेकर म्हणाल्या, “किरण माने यांनी मला वैयक्तिक त्रास दिला नाही. मात्र माझी सुन आणि नात यांच्यावर कायम टॉन्टिंग करत असायचा. तसेच तो कायम म्हणायचा की, मी या मालिकेचा हिरो आहे. मी याला काढून टाकीन, मी त्याला काढून टाकीन, अशा प्रकारे किरण माने यांचे वर्तन असायचे. तर ही काढून टाकण्याची भाषा कशासाठी?” असा सवाल त्यांनी केला. किरण माने याने शरद पवार यांची भेट घेतली असली तरी पवार साहेब आमच्यावर अन्याय करणार नाहीत, असेही मत सविता मालपेकर यांनी व्यक्त केले. याबरोबरच आमची भुमिका आम्ही प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून शरद पवार यांच्यापर्यंत पोहचवली असल्याचेही त्यांनी सांगितले. किरण माने यांची नवी पोस्ट, निर्मात्यांवर गंभीर आरोप राज्यातील मनोरंजन क्षेत्रातील सांस्कृतिक दहशतवादाचे बळी ठरलेल्या किरण माने यांनी रविवारी आणखी एक नवीन पोस्ट टाकत गंभीर आरोप केला आहे.   राजकीय पोस्ट लिहिल्यामुळे स्टार प्रवाहवरील मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकण्यात आलेले अभिनेते किरण माने सध्या जोरदार चर्चेत आहेत. आपण आपली वैयक्तिक राजकीय मतं सोशल मीडियावर व्यक्त केली म्हणून मालिकेच्या निर्मात्यांनी आपल्याला काढून टाकले, असा आरोप त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतना केला आहे. या वादानंतर आता किरण माने यांनी पुन्हा एक नवीन फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी काही गंभीर आणि थेट आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटले आहे ते पाहूया… “आपली तुफानी मोहीम पाहून, घाबरुन जाऊन प्रॉडक्शन हाऊसकडून पुढच्या मोठ्या कारस्थानाचा भाग सुरू.. … आज मिडीयावाले सेटवर जाणार आहेत…अनेक कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची सक्ती केली गेलेली आहे… करुद्या आरोप.. जाऊद्या झाडून.. ते बिचारे ‘पोटार्थी’ हायेत. प्राॅडक्शन हाऊस विरोधात बोलणं त्यांच्या पोटावर पाय आणेल. माझ्यासारखं काढून टाकलं जाईल म्हणून हादरलेत बिचारे… चारेक संघविचारी खरोखर माझ्या विरोधात आहेत.. बाकीच्यांवर मनाविरूद्ध जाऊन माझ्या विरोधात बोलावं लागणार.. तरीही ज्यांच्या पाठीचा कणा मजबूत आहे, ते ‘सत्य’ सांगतीलच ! पण दोस्तांनो, असल्या भंपकपणावर इस्वास ठेऊ नका. मराठीत लोटांगन घालनारे आनी लाळघोटे कलाकार ढीग आहेत. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा, हे तुमी ठरवा ! मी बी कंबर कसलेली हाय..कच्च्या गुरूचा चेला नाय मी ! तुका म्हणे रणी…नये पाहो परतोनी !!! – किरण माने यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. तसेच आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती. दरम्यान या मालिकेच्या निर्मात्यांनी व्य़ावसायिक कारणामुळे किरण माने यांना काढल्याचे स्पष्टीकरण दिल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. पण भाजप विरोधात सातत्याने लिखाण केल्याने किरण माने यांना काढण्यात आल्याचा आरोप होतो आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments