दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे यांनी 1 ऑगस्टला पत्नीसह राहत्या बंगल्याच्या गच्चीवरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी बडे यांनी फिर्याद देत संग्राम निकाळजेसह त्याच्या पाच अनोळखी साथीदारांना आरोपी केलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी ननावरे यांनी आपल्या मोबाईलमध्ये एक व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात राहणाऱ्या संग्राम निकाळजे, रणजितसिंह नाईक निंबाळकर, वकील ज्ञानेश्वर देशमुख आणि नितीन देशमुख या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं होतं.
नंदकुमार ननावरे आणि त्याचा पत्नीचा आत्महत्या प्रकरणात पोलिस तपासाला वेग मिळत नसल्याने नंदकुमार यांच्या भावाने स्वतःच बोट छाटून ते गृहमंत्र्यांना पाठवणार असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून योग्य ती उत्तर मिळत नसल्याने अखेर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक आठवड्याला शरीराचा एक भाग कापून पाठवणार असल्याचे सांगत डाव्या हाताचे एक बोट कापत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.