वैशाख वणव्याचे दिवस जवळ येत असताना मध्य भारतातील वातावरणात झालेल्या बदलाचे परिणाम दिसणार आहेत. मध्य भारतातील स्थितीचा महाराष्ट्राच्या आतील भागात परिणाम होणार आहे. विशेषकरून मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र या भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. विदर्भात गारपिटीसह पावसाची हजेरी लागेल. तसेच अनेक भागात ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाच्यावतीने वर्तविण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात पुढील चार दिवस वातावरणात मोठा बदल होणार आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होशाळीकर यांनी tv9 शी बोलताना वातावरण बदलाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मध्य भारतातील वातावरण बदलाचा महाराहस्त्राच्या आतील भागात अधिक परिणाम होईल. मध्य प्रदेश, विदर्भ आणि छत्तीसगढमध्ये पुढील चार दिवस पाऊस आणि गारपीट होईल. मुंबई आणि कोकण परिसरात पावसाची शक्यता नाही. मुंबईत हंगामी तापमान असेल. गेल्या आठवड्यात मुंबईचा पारा 38 अंशांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र आता तशी तापमानवाढ होणार नाही. तापमान सरासरीच्या पातळीवर असेल, असे होशाळीकर बोलताना सांगितले.
विदर्भ मराठवाडा भागात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या परिसरात दिवसा ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाण वाढले आहे, तर उन्हाचा पारा घसरला आहे. मागील तीन-चार दिवसांपासून मध्य प्रदेशातील विशेषतः पूर्व मध्य प्रदेशात अवकाळी पावसाला अनुकूल स्वरूपाचे वातावरण झाले आहे. या विस्तारीत सिस्टीममुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमावर्ती क्षेत्रात ढगाळलेले वातावरण, रात्रीच्या तापमानात किंचित घट, संध्याकाळी वादळ, गडगडाट आणि पावसाची हजेरी लागेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पुढील चार दिवस वातावरण बदल दिसून येणार आहे.