Friday, August 8, 2025
HomeMain Newsभाजपच्या दबावामुळे फेसबुकने १४ पेज हटवले

भाजपच्या दबावामुळे फेसबुकने १४ पेज हटवले

२०१९च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जानेवारी महिन्यातच भाजपने सरकारवर टीका करणार्या ४४ फेसबुक पेजची एक यादी फेसबुक इंडियाच्या कार्यालयाला पाठवून हे पेज बंद करण्यास सांगितले होते. या पेजवरून फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन होत असून त्यातून सरकारविरोधात खोटा प्रचार, अफवा पसरवणारे मजकूर प्रसिद्ध केले जात असल्याचा दावा भाजपने केला होता. त्यावर फेसबुक इंडियाने ३१ ऑगस्ट अखेर १४ पेज फेसबुकवरून काढून टाकली होती, असे वृत्त इंडियन एक्सप्रेस ने दिले आहे.

फेसबुकने काढून टाकलेल्या पेजमध्ये भीम आर्मीचे अधिकृत खाते, व्यंगात्मक साइट ‘वी हेट बीजेपी’, काँग्रेसला अनधिकृत समर्थन देणारे ‘द ट्रुथ ऑफ गुजरात’, मॅगसेसे पुरस्कार मिळालेले एनटीव्हीचे पत्रकार रवीश कुमार व ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना समर्थन करणारे पेज यांचा प्रामुख्याने समावेश होता.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भाजपने फेसबुक इंडियाला वगळण्यात आलेले १७ फेसबुक पेज पुन्हा सुरू करण्यास सांगितले. त्यामध्ये डाव्या विचारांचे ‘द चौपाल’ व ‘ऑप इंडिया’ या पेजचा समावेश होता. हे पेज मोनोटाइज करावे असेही भाजपने फेसबुकला सांगितले होते. एखादे पेज मोनोटाइज केल्यानंतर त्या पेजवर जाहिराती येतात व त्याचे पैसे मिळतात.

या १७ पेजबाबत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले की, ही पेज चुकून बंद करण्यात आली होती.

द चौपालचे संस्थापक विकास पांडे यांनी सांगितले की, २०१९मध्ये फेसबुकने त्यांचे पेज मोनाटाइज करण्यास बंद केले, त्यामुळे त्यांच्या साइटला मोनेटाइजेशनची मंजुरी मिळाली नाही. ऑप इंडियाने या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

भाजपने दिलेल्या १७ पेजच्या यादीत ‘पोस्टकार्ड न्यूज’चाही समावेश होता. हे पेज महेश हेगडे चालवत होते. त्यांच्या या पेजवरून धार्मिक तेढ वाढवणारा मजकूर व धार्मिक अवमानाची माहिती पसरवली जात होती. त्या प्रकरणी मार्च २०१८मध्ये हेगडे यांना पोलिसांनी अटकही केली होती. हेगडेंनी या बाबतही आपली प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments