Saturday, August 9, 2025
HomeMain Newsबिदाल आणि गोंदवले गावांनी निवडला कोरोनामुक्त मार्ग!

बिदाल आणि गोंदवले गावांनी निवडला कोरोनामुक्त मार्ग!

देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक जाणवला. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत बाधित होण्याचे प्रमाण अधिक आहे. या पहिल्या लाटेत गृह विलगीकरण संकल्पना यशस्वी झाली, परंतु दुसऱ्या लाटेची तीव्रता जास्त असल्यामुळे पूर्ण कुटुंब बाधित होऊ लागले. यामुळे शासनाला गृह विलगीकरणाचा विचार काही ठिकाणी बंद करून संस्थात्मक विलगीकरण या पर्यायाचा विचार करावा लागला. सातारा जिल्ह्यातील अधिक लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये प्रशासनाच्या मदतीने कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. माण तालुक्यातील बिदाल व गोंदवले बु. या गावांमध्ये प्रशासनाच्या मदतीने, सामाजिक संस्था व गावकऱ्यांच्या सहकार्याने असे सेंटर उभे करण्यात आले आहेत. या सेंटरमधून कोरोना बाधितांवर चांगल्या प्रकारच्या उपचाराबरोबर मानसिक आधारही दिला जात आहे. बिदाल व गोंदवले बु. या गावांचा आदर्श घेऊन इतर गावांनीही जिल्हा प्रशासनाच्या मदतीने अशा सेंटरची उभारणी करुन गावातील बाधितांना योग्य उपचार आणि इतर बाधित होणार नाही याची खबरदारी यातून घेतली जाईल असे काम झाले आहे. अशा प्रकारे इतर गावांनीही आपल्या गावातच उपचार मिळावे यासाठी प्रयत्न करुन आपले गाव कोरोनामुक्त करावे. यासाठी काय नक्की या गावांनी काय केलं आहे त्याचा हा आढावा

माण तालुक्यातील बिदाल हे जवळपास ७ हजार लोकसंख्या असलेले गाव. या गावाने कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत “विकास सेवा मंडळाच्या” माध्यमातून गावात अतिशय उत्तम काम केले आहे. या मंडळाने गावामध्ये तीन कोरोना केअर सेंटरमधून ५० बेडची निर्मिती केली आहे. गेल्या शुक्रवारपर्यंत ४८ रुग्ण या तीन कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत होते. विविध संस्थाच्या माध्यमातून २ ऑक्सिजन बेड ६ ऑक्सिजन सिलेंडर मिळाले आहेत. जिल्हा परिषदेकडून १ हजार कोरोना चाचणी किट मिळाले आहेत. या किटच्या माध्यमातून आशा वर्कर घरोघरी जाऊन व शिबीर घेऊन कोरोना चाचणीचे नमुने घेत आहेत, असे बिदालचे ग्रामस्थ धनंजय जगदाळे यांनी सांगितले.
जे रुग्ण कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल आहेत त्यांना औषधोपचार, आरोग्याची तपासणी डॉक्टर व आशा वर्कर करीत आहेत. या कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांना सकाळी उत्तम प्रतीचा नाष्टा, दोन अंडी, दुपारी जेवण, चार वाजता पुन्हा चहा व रात्री जेवण देण्यात येते, अत्यंत चांगली सुविधा असल्यामुळे रुग्ण आढळला तर तो गृह विलगीकरणात न राहता सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल होत आहे. त्यामुळे त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता कमी झाली.

या सेंटरमध्ये रोज सकाळी आणि संध्याकाळी रुग्णांकडून योग तसेच इतर व्यायाम प्रकार करून घेतले जात आहे. याचा त्यांच्या आरोग्य व मानसिकतेवर चांगला परिणाम झाला असून अतिगंभीर रुग्णही या सेंटरमध्ये बरे झाले आहेत. बिदाल गावातील या तीन सेंटरला मुंबई, पुणे तसेच इतर जिल्ह्यातूनही पैशांची तसेच उपयुक्त वस्तूंची मदत मिळत आहे.
विकास सेवा मंडळाने एक बँक खाते बँकेत काढले आहे. त्याची माहिती गावातील प्रत्येक नागरिकाला व्हावी यासाठी एक व्हॉटस्अप ग्रुप तयार करण्यात आला आहे. बँक खात्याची जमा झालेली रक्कम व कोरोना केअर सेंटरसाठी करण्यात आलेला खर्च प्रत्येक ८ दिवसांनी या व्हॉटस्अप ग्रुवर टाकण्यात येतो. त्यामुळे खर्चाच्या बाबतीतही पारदर्शकता निर्माण झाली असून या गावातील नागरिक आपापल्या परिने बँक खात्यात पैसे जमा करून या कोरोना केअर सेंटरला मदत करीत आहेत, असेही बिदालचे ग्रामस्थ जगदाळे सांगतात.

‘आम्ही गोंदवले सामाजिक संस्था’ व ‘जयंतीलाल मोदी फाउंडेशन’च्या, ‘ड्रीम फाउंडेशन’ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गोंदवले येथे ३६ ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल व १०० बेडचे कोरोना केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरमुळे गोंदवले बु. व आसपासच्या गावातील कोरोना बाधित रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरत आहे.

या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्णांवर चांगल्या पद्धतीने उपचार करीत आहेत. येथील हॉस्पिटलमध्ये अतिगंभीर रुग्णही ठणठणीत बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. या हॉस्पिटलमधील व कोरोना केअर सेंटरमधील प्रत्येक रुग्णाला चांगल्या प्रतीचा आहार गोंदवले महाराज ट्रस्टच्या माध्यमातून दिला जात आहे, असे गोंदवले बु. येथील अंगराज कट्टे यांनी सांगितले.

हॉस्पिटलमध्ये व कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक कामासाठी टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये औषध साठा, जेवण, बेडचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका यासाठी टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीमकडून योग्य ते नियोजन वेळेत केले जाते. यामुळे रुग्णांची गैरसोय होत नाही.

गोंदवले बु. व आसपासची जवळील गावांना भेटी देवून प्रत्येक घरातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. जो बाधित आढळला त्याला कोरोना केअर सेंटरमध्ये तात्काळ दाखल करण्यात येत आहे. जो रुग्ण गंभीर असला तर त्याला रुग्णालयात दाखल करून औषधोपचार करण्यात येत आहे. तात्काळ उपचार मिळाल्यामुळे मृत्यूचाही दर कमी होण्यास मोठी मदत मिळत आहे.
रोज सकाळी दाखल असलेल्या रुग्णांकडून योग तसेच इतर व्यायाम प्रकार करून घेतले जात आहेत. प्रत्येक वॉर्डात रुग्णांचा मनोरंजनासाठी टीव्ही लावण्यात आलेल्या आहेत. यामुळे रुग्णांच्या मानसिकतेत मोठा बदल होऊन उपचारासाठी सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. आज या हॉस्पिटल व कोरोना केअर सेंटरमध्ये १२७ रुग्ण उपचार घेत असल्याचेही ग्रामस्थ अंगराज कट्टे यांनी सांगितले.
बिदाल व गोंदवले बु येथील कोरोना केअर सेंटरला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी करून बिदाल व गोंदवले बु येथील ग्रामस्थांचे काम इतर गावांसाठी आदर्शवत असल्याचे सांगून त्यांनी कामाचे कौतुक केले.
राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रु., २५ लाख रु. व १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय त्यांना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभाग नोंदवून आपले गाव कोरोना मुक्त, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments