Saturday, August 9, 2025
HomeMain Newsबनावट चेक घोटाळे रोखण्यासाठी आता पॉझिटिव्ह पे सिस्टिम

बनावट चेक घोटाळे रोखण्यासाठी आता पॉझिटिव्ह पे सिस्टिम

बनावट चेक देऊन बँकांच्या खात्यातील रकमा पळवणार्‍यांना पायबंद घालण्यासाठी आता रिझर्व्ह बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा चेक देणाराने तो चेक दिल्यानंतर त्याची माहिती पुन्हा एकदा बँकेला आपणच चेक दिला असल्याची खातरजमा करावी लागेल. ही व्यवस्था एक जानेवारी २०२१ पासून सुरू केली जाणार आहे. मात्र ५० हजारापासून ५ लाखापर्यंतच्या चेकसाठी ही व्यवस्था ऐच्छिक राहील. पाच लाखापेक्षा अधिक रकमेच्या चेकला मात्र ती अनिवार्य असेल.

या नव्या व्यवस्थेनुसार चेक देणाराला तो इश्यू केल्यानंतर संपर्काच्या कोणत्याही माध्यमातून त्या चेकचे तपशील बँकेला कळवता येतील. त्या चेक क्रमांक, तारीख, दिलेली रक्कम, पेमेंट घेणाराचे नाव, असे तपशील कळवता येतील. या योजनेचा लाभ घेणार्‍याची नोंद बँकेत असेल आणि त्याने एखादा चेक दिल्यानंतर ही माहिती बँकेकडे आली नाही तर तो चेक त्याने दिला नसल्याचे दिसून येईल. अशा व्यवहारात बँक खातेदाराकडून पॉझिटिव्ह पे सिस्टिम नुसार माहिती येणार नाही तोपर्यंत चेकची रक्कम लाभधारकाच्या खात्यात जमा केली जाणार नाही.

मात्र ही माहिती खातेदाराने पाठवली तर ती दिलेल्या चेकशी पडताळून पाहिली जाईल. काही वेळा चेक दिलेला असतो पण तो ज्याच्या नावाने दिलेला असतो तो त्या चेकवरील रकमेत फेरफारी करून मोठी रक्कम लिहू शकतो. या व्यवस्थेने अशाही प्रकारचे गैरव्यवहार टळू शकतात. अशा प्रकारात खातेदाराची बँक आणि तो चेक ज्या बँकेत जमा केला असेल ती बँक अशा दोघांनाही चेक ट्रंकेशन सिस्टिम मधून सारे तपशील पडताळून पाहता येतात.

एखाद्या फसवणुकीच्या प्रकारात चेक काढणारा खातेदार हा या सिस्टिमचा वापर करीत असेल तरच त्याला तक्रार निवारणाच्या प्रक्रियेत फिर्यादी होण्याचा अधिकार असेल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments