Friday, August 8, 2025
HomeMain Newsफोन टॅपिंग चौकशीसाठी समिती

फोन टॅपिंग चौकशीसाठी समिती

फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नियुक्त केली आहे.

नुकत्याच झालेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभेमध्ये फोन टॅपिंग प्रकरण गाजले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सभागृहात बोलताना फोन टॅपिंगसंदर्भात गंभीर आरोप केले होते. अनेकांचे फोन टॅपिंग झालेले असू शकते असे म्हणत त्यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यावर फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी जाहीर केले होते.

या समितीचे अध्यक्ष राज्याचे पोलीस महासंचालक असतील तर राज्य गुप्तवार्ता विभाग मुंबईचे आयुक्त आणि मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा) हे दोन समितीचे सदस्य असणार आहेत. ही समिती या प्रकरणाची चौकशी करेल आणि तीन महिन्यांत अहवाल सादर करणार आहे.

विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले होते, “मी भाजप खासदार होतो. माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं कारण काही नव्हतं. पण मला मिळालेल्या माहितीनुसार माझं नाव ठेवण्यात आलं होतं अमजद खान. केंद्रातले सध्याचे मंत्री दानवे यांच्या पीएचा नंबर देखील टॅप केला गेला. खासदार संजय काकडेंचा नंबर टॅप केला गेला. अशी खूप नावं आहेत. भाजपच्या लोकांचे देखील फोन टॅप केले गेले. कुणाचीही गोपनीयता भंग करण्याचा अधिकार कुणालाही नाही.”

“हे फोन टॅपिंग करण्याची गरज काय? याच्यामागे कोण आहे? २०१७-१८ च्या काळात पुणे पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून हे फोन टॅप केले गेले. कुणाच्या आदेशाने हे झाले? आमच्यावर आरोप लावले की ही व्यक्ती कोणतंही काम, व्यवसाय करत नाही. अंमली पदार्थांची तस्करी करत आहे. हे माझ्यावरच नाही, तर जितक्या लोकांचे फोन टॅप झाले, त्यांच्यावर हा आरोप करण्यात आला. किती लोकांचे, कुणाचे फोन टॅप केले गेले याची माहिती हवी. याचे सूत्रधार कोण आहेत? याला शासनाची मान्यता घ्यावी लागते”, अशी मागणी नाना पटोले यांनी केली होती.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments