सातारा : फरक बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनिता गुरव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज अटक केली. शिक्षणाधिकाऱ्यालाच लाच घेताना पकडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
संबंधीत तक्रारदाराने फरक बिलाची रक्कम मिळण्यासाठी जिल्हापरिषदेत अर्ज केला होता. ही रक्कम मिळवून देण्यासाठी श्रीमती गुरव यांनी 15 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पडताळणीमध्ये तडजोडी अंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार दहा हजार रुपयांची रक्कम घेताना श्रीमती गुरव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषदेतील त्यांच्या कार्यालयातच रंगेहाथ पकडले. याबाबतची माहिती मिळाल्यावर संपूर्ण शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आरिफा मुल्ला व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.