पुण्यातल्या आर्य शिरराव या 15 वर्षांच्या तरुणानं ब्ल्यू व्हेल गेमच्या (Blue Whale Online Game) व्यसनात स्वत:चं आयुष्य संपवलं. आर्यनं तो राहत असलेल्या सोसायटीच्या 15 व्या मजल्यावरुन उडी मारुन जीव दिला. तो गेल्या सहा महिन्यांपासून या खेळाच्या विळख्यात अडकला होता. धक्कादायक म्हणजे त्यानं स्वत:च त्याच्या मृत्यूची सविस्तर योजना बनवली होती, अशी माहिती देखील आता उघड झाली आहे.
आर्यच्या मृत्यूनं त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसलाय. त्याचबरोबर पुण्यासह संपूर्ण राज्यात यावर हळहळ व्यक्त करण्यात येतीय. पण, ब्लू व्हेल गेममुळे एखाद्यानं जीव देण्याची ही पहिली घटना नाही. यापूर्वीही जगभर या घटना घडल्या आहेत.
त्याला स्वत:चा, कुटुंबीयांचा, जगाचा विसर पडतो. त्याच्या सर्व आयुष्याचा हा गेम ताबा घेतो. आणि दुर्दैवानं स्वत:चा जीव घेणे हा खेळातून बाहेर पडण्याचा अखेरचा मार्ग होतो.
‘ब्लू व्हेल चॅलेंज’ला सुसाईड गेम असंही म्हंटलं जातं. हा खेळ त्याच्या धोकादायक आणि भयंकर टास्कसाठी कृप्रसिद्ध आहे. 50 दिवसांच्या या खेळात स्पर्धकांना क्युरेटरकडून वेगवेगळे टास्क दिले जातात. सुरुवातीच्या खेळामध्ये मध्यरात्री उठणे किंवा भीतीदायक सिनेमा पाहणे यासारख्या टास्कचा समावेश असतो. त्यानंतर हे टास्क हळूहळू धोकादायक होतात. यामध्ये इमारतीच्या गच्चीच्या कठड्यावर उभं राहणं, हात कापून त्यावर देव माशाचं चित्र काढणे, जनावराची हत्या करणे अशा टास्कचा समावेश असतो. स्वत:चा जीव घेणं हा या खेळातील शेवटचा टास्क असतो.
फिलिप बुदेकीन या रशियन तरुणानं 2013 साली ब्लू व्हेल चॅलेंजची सुरुवात केली. रशियन तरुणांना मृत्यूसाठी प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली त्याला तुरुंगवासही झालाय. फिलिपनं त्यानं हा खेळ सुरु केला याचं कारणही सांगितलं.
‘या जगात काही मनुष्य असतात. तर काही जैविक कचरा. ज्या लोकांचा समाजाचा कोणताही उपयोग नाही. जे समाजाचं फक्त नुकसान करत असतात अशा लोकांना या समाजातून मुक्त करण्याचं काम मी करत आहे,’ असं संतापजनक स्पष्टीकरण फिलिपनं एका मुलाखतीमध्ये दिलं होतं.
फिलिपनं कुमारवयीन मुलांना या चॅलेंजसाठी संपर्क केला. या वयात मुलांच्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेत मोठे बदल होत असतात. त्यांच्या मनातील घुसळणीचा त्यानं गैरफायदा घेतला. या मुलांपैकी कोण हे चॅलेंज यशस्वीपणे पूर्ण करु शकेल त्यांना तो हेरत असे. स्काईप किंवा अन्य ऑनलाईन माध्यमातून त्यांच्याशी बोलत असे. त्यांना निराशाजनक कंटेट पाहायला लावत असे. त्यामधील कमकुवत मुलांची दिशाभूल करुन त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करत असे.
या चॅलेंजला Blue Whale हे नाव का देण्यात आलं याबाबत वेगवेवेगळी कारणं दिली जातात. या विषयाचा मागोवा घेणाऱ्या अभ्यासकांच्या मतानुसार देव मासा स्वत:ला समुद्र किनाऱ्यावर येतात. त्यामध्ये त्यांचा जीव जातो. तसंच या गेममध्ये स्पर्धकांना त्यांच्या मृत्यूच्या जवळ आणलं जातं. आणखी एका अंदाजानुसार ‘लुमेन’ या रशियन बँडच्या गाण्यांचा या नावामागे संदर्भ आहे.
ब्लू व्हेल चॅलेंजमधील स्पर्धकांना प्रत्येक टास्कचे व्हिडिओ शूट करणे बंधनकारक असते. ते टास्क पूर्ण केल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड त्यांना नियंत्रकाला (Admin) द्यावा लागतो. एखाद्या स्पर्धकानं हे टास्क करण्यास नंतरच्या टप्प्यात मनाई केली तर त्याला धमकावण्यात येतं. त्याच्या यापूर्वीच्या टास्कचे व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी दिली जाते.