Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्र'पावसात भिजू नये म्हणून बाप्पाला मशिदीत नेले, तीच परंपरा बनली

‘पावसात भिजू नये म्हणून बाप्पाला मशिदीत नेले, तीच परंपरा बनली

सांगलीच्या वाळवा तालुक्यात गोटखिंडी हे गाव आहे. इथल्या झुझार चौकातल्या मशिदीत न्यू गणेश मंडळाच्या गणपतीची दर वर्षी दहा दिवसांसाठी प्रतिष्ठापना करण्यात येते. यंदाचं त्यांचं प्रतिष्ठापनेचं 44 वं वर्ष आहे.

या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी हिंदू आणि मुस्लीम धर्मीय लोक मोठ्या संख्येने येत असतात.

मशिदीतल्या या गणपतीची गोष्ट सुरू होते 1961 साली. या गावातील काही तरुणांनी एकत्र येऊन गणपती बसवला.

गावातील मुख्य चौकात हा गणपती होता. ज्यांनी हा गणपती बसवला होता त्यांनी अत्यंत उत्साहानं पण एकदम साध्या पद्धतीने गणपतीची स्थापना केली.गोटखिंडी गावातील अशोक पाटील आम्हाला यामागची गोष्ट सांगू लागले. साध्या पद्धतीनं गणपती बसवला होता. म्हणजेच गणपतीसाठी मंडप घातलेला नव्हता, असं ते म्हणाले.

गणेशोत्सव म्हणजे पावसाळ्याचा काळ. असाच एका रात्री मोठा पाऊस आला. मंडप किंवा इतर काही व्यवस्था नसल्यानं पावसात गणपतीची मूर्ती भिजायला लागली. गावातील एका मुस्लीम समाजातील व्यक्तीनं ते पाहिलं. त्यानं गणेश मंडळातील लोकांना बोलवत याची कल्पना दिली.

त्यानंतर सगळेजण त्याठिकाणी जमले. काय करायचं यावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी निजाम पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांनी पावसात भिजणारी गणपतीची मूर्ती जवळच्या मशिदीत ठेवा अशी विनंती सगळ्यांना केली.

त्याठिकाणी असणाऱ्या सगळ्यांनी ठरवलं आणि गणपती मूर्ती मशिदीत ठेवली.

त्यावर्षी विसर्जन होईपर्यत त्या मशिदीतच गणपतीची पूजा अर्चना करण्यात आली. पण त्यानंतर पुढच्या वर्षी गणपती बसवला नाही, अशी माहिती अशोक पाटील यांनी दिली. गोटखिंडी गावातील ही गोष्ट सांगणारे अशोक पाटील यांचे वडीलही त्या गणपतीची स्थापना करणाऱ्यांमध्ये होते. त्यामुळं 1961 चा हा प्रसंग त्यांनी आम्हाला अत्यंत तपशीलवार सांगितला.

पुढं ते म्हणाले की, नंतर1986 मध्ये गोटखिंडी गावातील काही तरुण शेजारच्या बावची गावात गणपती उत्सवानिमित्त आयोजित कलापथकाचा कार्यक्रम बघायला गेले. त्यावेळी गावातील हिंदू मुस्लीम दोन्हीही समाजातील लोक तिथं होते.

हे पाहून त्यांच्या मनात विचार सुरू झाले. आपणही गावात अशाप्रकारचा गणेशोत्सव साजरा करायला हवा असं त्या तरुणांना वाटलं.

यावर चर्चा झाली आणि जुन्या घटनेची आठवण ठेवत मग सगळ्यांनी गावातील मशिदीत गणपती बसवायला सुरुवात केली.

या नव्या गणपती मंडळाचे अध्यक्ष होते इलाही पठाण. वेळी सुभाष थोरात, अशोक शेजावळे, विजय काशीद,अर्जुन कोकाटे यांनीही पुढाकार घेऊन उत्सवाला हातभार लावला. 1961 साली ज्यांनी गणपती बसवला होता त्यांच्या दुसऱ्या पिढीने 1986 साली गणपती बसवला. आजत्यांच्या तिसऱ्या पिढीनेही हा वारसा जपला आहे, असं पाटील सांगतात.

1961 साली बापूसाहेब पाटील, श्यामराव थोरात, वसंतराव थोरात, निजाम पठाण, खुदबुद्दीन जमादार,रमजान मुलाणी धोंडी पठाण यांनी गणपती बसवला होता.

1986 साली इलाही पठाण, अशोक पाटील, सुभाष थोरात, अशोक शेजावळे, विजय काशीद, अर्जुन कोकाटे यांनी पुढे ही प्रथा सुरु केली.

तर तिसऱ्या पिढीत गणेश थोरात, सागर शेजावले, राहुल कोकाटे, लखन पठाण, सदानंद महाजन हे तरुण हा वारसा पुढे चालवत आहेत. लखन पठाण यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, “आमच्या गावात आम्ही सर्व जाती धर्माचे लोक एकोप्यानं राहतो. आमचे आजोबा निजाम पठाण यांनी, त्यानंतर माझ्या वडिलांनीही गणपती उत्सवात सहभाग घेतला.

आता मी स्वतः सहभागी असतो. हिंदू आणि मुस्लीम दोन्हीही समाजाचे सण आम्ही एकत्रित साजरे करतो. दोन वेळा मोहरम आणि गणपती एकत्र आले. त्यावेळी पीर आणि गणपती यांची एकत्रित मिरवणूक काढली होती.” पठाण आणि अशोक पाटील चांगले मित्र आहेत. ते म्हणाले की, “काही वेळा बकरी ईद हा सण गणपतीच्या काळात आला होता. तेव्हा मुस्लीम बांधवानी कुर्बानी केली नाही. आमच्या गावात शंकराचे मंदिर आहे. मुस्लीम बांधव त्या दिवशी बोकड कापत नाहीत. एकादशीलाही गावात मांसाहार केला जात नाही.”

हे पूर्वीपासून सुरू आहे. कोणत्याही सक्तीने नाही तर अगदी मनापासून हे सर्व केलं जातं. एवढा बंधुभाव गावात असल्याचं ते म्हणाले. गणेशोत्सव सुरू असतानाचा एक किस्सा पाटील आणि पठाण यांनी सांगितला. मुस्लीम पंथातील काही लोक एकदा गावात आले होते. त्यांनी मुस्लीम बांधवाना गणेशोत्सव साजरा करू नका असं म्हटलं. या उत्सवाबाबत नकारात्मक गोष्टी सांगितल्या.

पण, आमच्या गावातील सर्वच्या सर्व मुस्लीम बांधवानी आम्ही हिंदू-मुस्लीम वर्षानुवर्षे भावाभावासारखे वागतोय, असं त्यांना स्पष्टपणे सांगितलं.

आम्हाला या उत्सवातून ऊर्जा मिळते, ‘तुम्ही दुही पेरू नका’ असं त्यांनी सांगितलं आणि सन्मानाने त्यांना गावाबाहेरचा रस्ता दाखवला.

पूर्वी बैलगाड्या होत्या. त्यामुळं गणपतीची मिरवणूक बैलगाड्यातून गुलाल उधळत निघायची, आता तशाच जल्लोषात ट्रॅक्टरने निघते, असं लखन पठाण म्हणाले. विसर्जनानंतर संपूर्ण गावाला जेवण असतं. गावातील महिला, पुरुष या उत्सवात सहभागी होतात. आरतीचा मान रोज एका कुटुंबाला असतो. दोन्हीही समाजातील जोडप्यांना आरतीचा मान दिला जातो, असं अशोक पाटील म्हणाले.

“आमच्या आधीच्या पिढीने सुरू केलेल्या या प्रथेमुळं गोटखिंडी गाव आदर्श गाव म्हणून पुढं आलं आहे. गावाचं नाव सांगताना अभिमान वाटतो. दोन्हीही समाजातील लोकांनी तरुण पिढीला फार मोठं वैभव दिलं आहे. ते जपण्याची जबाबदारी आमची आहे”, असं स्थानिक रहिवासी गणेश थोरात म्हणाले.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments