“मला न्याय द्या” अशी मागणी करत मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास भरत नावाच्या तरुणाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील राष्ट्रध्वजाच्या खांबावर चढून आंदोलन केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी जमली होती.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाची धावाधाव सुरू झाली. अग्निशमन दल, फायर रेस्क्यू टीम तसेच पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांकडून भरतला खाली उतरण्याची वारंवार विनंती करण्यात येत होती. “तुझ्या मागण्यांचा विचार करू, तू सुरक्षितपणे खाली उतर” अशा आश्वासनांच्या माध्यमातून त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून भरतला शांतपणे खाली येण्याचे आवाहन केले.
मात्र, सुरुवातीला भरत कोणत्याही परिस्थितीत खाली उतरण्यास तयार नव्हता. आंदोलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढत गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर प्रशासन व पोलिसांच्या सातत्यपूर्ण समुपदेशनानंतर सुमारे दीड तासानंतर भरत स्वतःहून खाली उतरला. त्यानंतर त्याचे आंदोलन संपुष्टात आले.
या घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली नसून प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला. भरतच्या मागण्यांबाबत संबंधित विभागामार्फत चौकशी करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.



