उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आज झालेल्या कंपनीच्या बैठकीत 67 वर्षीय नोएल यांची टाटा सन्सच्या ट्रस्टचे नेतृत्व करण्यासाठी निवड करण्यात आली. रतन टाटा यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी बोर्डाची बैठक झाली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.रिटेल व्यवसाय ट्रेंट चालवणाऱ्या नोएल यांच्या नियुक्तीची औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस टाटा समूहात सामील झाल्यापासून समूहाच्या वाढीला चालना देण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. नोएल टाटा यांची तीन मुले – लेआ, माया आणि नेव्हिल – यांची सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्टशी संबंधित अनेक ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.नवल टाटा यांनी दोन विवाह केले होते. त्यांचा पहिला विवाह सुनी कम यांच्याशी झाला. सुनी आणि नवल या दांपत्याला दोन मुलं होती. रतन आणि जिमी अशी या दोन मुलांची नावं आहेत, पण दोघांचंही लग्न झालेलं नाही. तर नवल यांनी 1955 मध्ये स्विझरलँडमधील उद्योजिका सिमोन यांच्याशी दुसरा विवाह केला. नोएल टाटा सध्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्त म्हणून काम करत आहेत. नोएल टाटा यांनी ससेक्स विद्यापीठातून पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं.नोएल हे टाटा वोल्टास लिमिटेड, टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, तसंच टाटा इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांचं सध्या अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तर टाटा स्टील आणि टायटन लिमिटेड कंपनीचे ते उपाध्यक्ष आहेत. यापूर्वी ते सुमारे 11 वर्ष ट्रेंट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. ट्रेंट लिमिटेड या कंपनीचे उपाध्यक्ष असताना त्यांनी या कंपनीचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला. एका स्टोअरवरून त्यांनी या कंपनीची सुमारे 700 स्टोअर उभारण्याचं काम देशभरात केलं. त्याचसोबत ते नेरोलॅक पेंट्स आणि स्मिथ या कंपन्यांच्या संचालक मंडळावर देखील आहेत.