Monday, March 23, 2026
HomeMain Newsनेत्यांची मांडी, कार्यकर्त्यांचा उर

नेत्यांची मांडी, कार्यकर्त्यांचा उर

राजकारणात विचारांपेक्षा व्यवहार जास्त बोलतो, आणि या व्यवहाराच्या नात्यांत सर्वात जास्त गंडलेले असतात ते कार्यकर्ते. सध्या समाजमाध्यमांवर फिरणारे काही फोटो पाहिले तर आपल्याला ही वास्तवता ठळकपणे दिसते. कुठल्यातरी भव्य लग्नसोहळ्यात देशातील दोन वेगवेगळ्या विचारसरणीचे नेते एकत्र बसलेले, बाजूला उद्योगपती, ब्युरोक्रॅट्स, आणि त्यांच्या मध्ये हसरा संवाद — ही दृश्यं आता सामान्य झाली आहेत.

या सगळ्यांत काही आक्षेपार्ह नाही. मानवी नातेसंबंधांमध्ये मैत्री, सौजन्य, आणि सामाजिक संबंध असणं चुकीचं नाही. पण प्रश्न इथे थांबत नाही. प्रश्न एवढाच आहे की, ज्यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी रक्त आटवून संघर्ष केले, त्या नेत्यांनी एकमेकांविरुद्ध द्वेषाची बीजं पेरली, त्याच नेत्यांचे फोटो जेव्हा एका मंचावर दिसतात, तेव्हा कार्यकर्त्यांच्या छातीत जळजळ होते.

३० ऑक्टोबरला सुशीलकुमार शिंदेंच्या नातीच्या लग्नात शरद पवार, गौतम अदानी आणि शिंदे एकत्र दिसले. ११ नोव्हेंबरला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत आशिष शेलार हे शरद पवार पॅनेलकडून जितेंद्र आव्हाड आणि मिलिंद नार्वेकरांसाठी मतं मागताना दिसले. आणि १२ नोव्हेंबरला एका आयपीएस अधिकाऱ्याच्या कन्येच्या लग्नात पुन्हा एकदा शरद पवार, गौतम अदानी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्र हसत बोलताना दिसले.

हे दृश्य पाहून सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या मनात प्रश्न निर्माण होतो — मग आमचं काय? आम्ही रस्त्यावर उतरून लाठ्या खाल्ल्या, एकमेकांशी वैर धरलं, नाती तोडली, आणि तुम्ही मात्र गोड गप्पा मारत बसता?

राजकारणाचं हे द्वंद्व फार जुने आहे. नेत्यांमध्ये वरवर संघर्ष असतो, पण तळाशी व्यवहार, सोय आणि सामंजस्य असतं. कार्यकर्त्यांना मात्र त्या संघर्षाची जाणीव खऱ्या युद्धासारखी करून दिली जाते. त्यांच्या अंगावर जाळ पेटवला जातो, भावना उफाळून येतात, आणि मग तेच कार्यकर्ते एकमेकांचे शत्रू होतात. या सगळ्यांत नेते मात्र आपली मैत्री, आपले हितसंबंध आणि आर्थिक व्यवहार टिकवून ठेवतात.

राजकीय नेत्यांमध्ये सामाजिक कार्यक्रमांत भेटणं यात गैर नाही, पण त्यांनी हे स्पष्ट सांगणं गरजेचं आहे की आपले विचार भिन्न असले तरी मानवी संबंध टिकवले पाहिजेत. मग कार्यकर्त्यांना देखील तसंच सांगितलं पाहिजे — “आपण विरोधक आहोत, शत्रू नाही.” पण इथे उलट होतं. वर नेते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसतात, आणि खाली कार्यकर्ते एकमेकांच्या उरावर बसतात.

लोकशाहीमध्ये कार्यकर्ते हेच खरी ताकद असतात. पण आज कार्यकर्ते हे केवळ टाळ्या वाजवण्यासाठी, घोषणा देण्यासाठी आणि सोशल मीडियावर कीबोर्ड योद्धा बनण्यासाठी वापरले जातात. त्यांच्याकडे विचार नाही, दिशादर्शन नाही, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना सत्य सांगणारा नेता नाही.

एकेकाळी पक्षनिष्ठा म्हणजे विचारनिष्ठा होती. आज पक्षनिष्ठा म्हणजे व्यक्तिनिष्ठा झाली आहे. कार्यकर्त्याने विचार विचारून नव्हे, तर नेता कोण आहे हे पाहून भूमिका घ्यायची. आणि नेते मात्र जिथे हितसंबंध मिळतील, तिथे हात मिळवायचे.

राजकारणात व्यवहार असतात, हे सर्वांना माहीत आहे. पण कार्यकर्त्यांना ते सांगितलं जात नाही, कारण कार्यकर्त्यांचा विश्वास आणि भावना हेच पक्षाचे ‘इंधन’ असतात. आणि हे इंधन नेते फार हुशारीने वापरतात. ते कार्यकर्त्यांना भावनिक करतात, एकमेकांवर भडकवतात, आणि स्वतः मात्र सत्तेच्या वातानुकूलित खोलीतून नाती जपतात.

समाजमाध्यमांवरील फोटो आणि व्हिडिओ पाहून अनेक कार्यकर्त्यांना धक्का बसतो. कारण ते ज्यांना विरोधक समजत आले, ज्यांच्यावर कठोर टीका केली, तेच त्यांच्या नेत्यांसोबत हसत, गप्पा मारत दिसतात. ही दृश्यं केवळ मैत्रीची नाहीत, तर कार्यकर्त्यांच्या भावनांवरील ‘तपासणी अहवाल’ आहेत.

आजच्या कार्यकर्त्यांनी जागं व्हायला हवं. राजकारण म्हणजे वैर नव्हे, स्पर्धा आहे. आणि स्पर्धेत परस्पर सन्मान ठेवला, तर लोकशाही अधिक सक्षम होते. नेते हे एकमेकांशी व्यवहार करतात, पण कार्यकर्त्यांनी आपली किंमत ओळखली पाहिजे. नेत्यांच्या फोटोसाठी हुरळून जाण्याऐवजी त्यांनी त्या फोटोमागचं राजकारण समजून घेतलं पाहिजे.

आपण पाहतो की प्रत्येक निवडणुकीनंतर नेत्यांची भूमिका बदलते. जे काल विरोधक होते ते आज मित्र होतात, आणि उद्या पुन्हा विरोधक बनतात. हे राजकारणाचं ‘फ्लिप सर्किट’ आहे. पण कार्यकर्ते मात्र अजूनही भावनांच्या धाग्यांनी बांधलेले असतात. तेच कार्यकर्ते मग समाजात वैर निर्माण करतात, आणि नेते मात्र एकत्र फोटो काढतात.

खरं तर, अशा प्रसंगांकडे कार्यकर्त्यांनी वास्तववादी नजरेने पाहायला हवं. हेच लोक जे दिवसभर संसदेत किंवा सभागृहात एकमेकांवर आरोप करतात, तेच संध्याकाळी एकत्र जेवण करतात. आणि त्यात काही गैर नाही — पण मग हेच स्पष्ट सांगितलं पाहिजे की राजकारण हे वैचारिक स्पर्धा आहे, वैयक्तिक वैर नाही.

आज कार्यकर्त्यांची सर्वात मोठी गरज आहे ती विचारांचं प्रशिक्षण आणि भावनिक स्वातंत्र्य. नेते बदलतात, युती बदलतात, समीकरणं बदलतात — पण विचार आणि मूल्यं कायम राहिली पाहिजेत. आणि हे फक्त तेव्हाच शक्य आहे जेव्हा कार्यकर्ते स्वतः विचार करायला शिकतील.

फोटो पाहून धक्का बसू नये, तर त्यातून शिकायला हवं की सत्तेच्या खेळात हितसंबंध कसे जपले जातात. नेत्यांच्या मांडीवर बसण्याची वेळ त्यांची आहे, पण आपल्याला उरावर बसवून घेऊ नये.

म्हणूनच, आजचा प्रश्न नेत्यांना नाही, तर कार्यकर्त्यांना आहे —
तुम्ही अजूनही त्यांच्या झुंजीत ओढवून घेणार का, की आता विचारपूर्वक स्वतःची भूमिका ठरवणार?

नेते एकमेकांसोबत चहाचे कप शेअर करत असताना, कार्यकर्ते अजूनही सोशल मीडियावर एकमेकांना ट्रोल करत असतील, तर ती लोकशाही नव्हे — ती गुलामी आहे.

वेळ आली आहे “नेत्यांची मांडी” आणि “कार्यकर्त्यांचा उर” या दोन्हींचा हिशोब लावण्याची.
नेते आपलेच असतात, पण आपण त्यांचे किती ‘आपले’ आहोत, हे ठरवायचं काम आता कार्यकर्त्यांनीच करायचं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments