नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरात जवळपास ६० हजार बालकांचा जन्म झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे भारत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बालकांचा जन्म होण्याच्या यादीमध्ये अव्वल राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. भारतामध्ये पहिल्याच दिवशी ६० हजार बालकांचा जन्म होईल, असे मुलांसंदर्भातील विषयांवर जगभरामध्ये काम करणाऱ्या युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड) या संस्थेने म्हटले होते. त्याचबरोबर १ जानेवारी २०२१ रोजी जगभरामध्ये ३ लाख ७० हजार बालकांचा जन्म होईल, असेही युनिसेफने म्हटले होते. पण भारतात यंदा वर्षाच्या पहिल्याच दिवशी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण हे मागील वर्षीपेक्षा कमी आहे. मागील वर्षी भारतात ६७ हजाराहून अधिक बालकांचा जन्म झाला होता.



