Sunday, August 10, 2025
HomeMain Newsज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन काळाच्या पडद्याआड

मनोरंजन विश्वाने यावर्षी 2020 मध्ये अनेक कलाकार गमावले आहेत. त्यातच आज सकाळी मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली असून हृदयविकाराच्या झटक्यामुळे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन झाले आहे. ते 83 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी 5 डिसेंबर रोजी रात्री त्यांचे निधन झाले.

त्यांनी मराठी नाटक-चित्रपटांसह अनेक मालिकाही गाजवल्या आहेत. ते अलीकडेच ‘अग्गबाई सासूबाई..’ या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारात होते. त्यांनी अनेक नाटके आणि चित्रपटात साकारलेल्या भूमिका अविस्मरणीय आहेत. त्यांनी 1974 मध्ये रत्नाकर मतकरींबरोबर आरण्यक या नाटकात काम केले होते. त्यांनी यामध्ये धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. त्यांनी ही भूमिका वयाच्या 82 व्या वर्षीही साकारली होती. मराठी मनोरंजन विश्वामध्ये त्यांचा एक दबदबा होता. त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशा भारदस्त भूमिका साकारल्या. झुपकेदार मिशा, आवाजातील जरब, त्या त्या भूमिकेसाठी आवश्यक धीरगंभीर चेहरा अशी त्यांची ओळख होती.

रवी पटवर्धन यांचा जन्म 06 सप्टेंबर 1937 साली झाला होता. त्यांनी बालकलाकार म्हणून देखील काम केले आहे. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी नाट्यमहोत्सवातील बालनाट्यात काम केले होते. या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष बालगंधर्व आणि स्वागताध्यक्ष आचार्य अत्रे होते.

ते अलीकडेच ‘बबड्याचे आजोबा’ म्हणून पुन्हा एकदा घराघरात पोहोचले होते. त्यांनी एक तापट पण तितकेच प्रेमळ अशी आजोबा ‘दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी’ ही भूमिका साकारली. रवी पटवर्धन यांनी यावेळी निवेदिता सराफ यांच्या सासऱ्याची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून त्यांनी सासरे आणि सून या नात्यातील एक वेगळा पैलू मांडला. कोरोना काळातील ज्येष्ठ नागरिकांना काम करण्याची परवानगी नसल्याने त्यांना या मालिकेत पुन्हा पाहता आलं नाही. काही वेळा ते व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून या मालिकेत दिसले होते.

रवी पटवर्धन यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाले तर रिझर्व्ह बँकेत ते नोकरी करत होते. ठाण्याच्या घरात ते राहत होते, त्यांनी अखेरचा श्वास याच घरात घेतला. रवी पटवर्धन यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, मुलगी, जावई, 4 नातवंडे असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments