Saturday, August 9, 2025
HomeMain Newsकारमधून प्रवास करताना मास्क आवश्यक आहे का? सरकार आणि डॉक्टरांचं उत्तर

कारमधून प्रवास करताना मास्क आवश्यक आहे का? सरकार आणि डॉक्टरांचं उत्तर

कोराना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यातच आता कारमध्ये मास्क वापरणं बंधनकारक आहे की नाही हा मुद्दा थेट न्यायालयापर्यंत पोहचला आहे. दिल्लीत वकिलांनाच 2000 रुपयांचा दंड झाल्याने त्यांनी याविरोधात थेट याचिकाच दाखल केली. तसेच ही दंड आकारणी बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. यावर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारकडे विचारणा केली. त्यामुळे कारमध्ये मास्क वापरावा की नाही याबाबत स्पष्टता आली आहे

एकिकडे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वच ठिकाणी मास्क बंधनकारक झालाय. मास्क न वापरल्यास राजधानी दिल्लीत 2000 रुपयांपर्यंत दंड केला जात आहे. केंद्र सरकारपासून राज्य सरकारांपर्यत सर्वच स्तरावर मास्क वापरावा यासाठी जनजागृती आणि कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. त्यातच आता एखादी व्यक्ती एकटी किंवा कुटुंबासोबत कारमधून जात असेल तर त्यांनी मास्क वापरावा की नाही यावर वाद सुरु आहे.

पोलिसांनी कारमध्ये मास्क न वापरल्याने अनेक नागरिकांवर कारवाई केली आहे. याविरोधात न्यायालयातही याचिका दाखल झाली. यानंतर केंद्र सरकारकडून कारमध्ये एकटा चालक असेल तर त्याने मास्क वापरावा अशी कोणतीही सूचना दिली नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच एकट्या चालकाला मास्क वापरणं बंधनकारक नसल्याचं न्यायालयाला सांगितलं.

मास्कबाबतचा नेमका नियम काय?

काही दिवसांपूर्वीच दिल्लीत कार चालवत असताना वकिल चालकाने मास्क घातलेला नसल्याने त्याला दंड ठोठावण्यात आला. यानंतर या वकिलाने थेट दिल्ली उच्च न्यायालयात याचिक दाखल करत याला आव्हान दिलं. तसेच हा दंड बेकायदेशीर असल्याचं म्हटलं. केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितलं, “एकटा व्यक्ती कारमध्ये प्रवास करत असताना त्याने मास्क वापरावा अशी कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही.”

त्यामुळे आता हे स्पष्ट झालं आहे की कारमध्ये एकट्याने प्रवास करत असताना मास्क वापरणं बंधनकारक नाही. तसेच यासाठी दंड आकारणं देखील बेकायदेशीर आहे. असं असलं तरी केंद्राने आता या विषयावरील चेंडू राज्य सरकारांकडे टोलंवला आहे. हा विषय राज्यांचा आहे आणि राज्य सरकारच यावर नियम निश्चित करेल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments