Saturday, March 28, 2026
HomeMain Newsइंदोरमध्ये सातारा जिल्हा परिषदेकडून घनकचरा व प्लास्टिक व्यवस्थापनाचा अभ्यास दौरा

इंदोरमध्ये सातारा जिल्हा परिषदेकडून घनकचरा व प्लास्टिक व्यवस्थापनाचा अभ्यास दौरा

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सातारा जिल्हा परिषद राज्यात नेहमीच अग्रेसर राहिली असून, सध्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन हे महत्त्वाचे आव्हान ठरत आहे. विशेषतः प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे त्याचे संकलन, प्रक्रिया व पुनर्चक्रण प्रभावीपणे करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

जिल्ह्यात मल्हार पेठ, वर्णे, वाठार स्टेशन, पुसेगाव, पांगारी, तरडगाव, पाचवड व मसूर येथे तालुकास्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प तसेच एमआरएफ (Material Recovery Facility) सेंटर उभारण्यात येत आहेत. या प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी देशातील स्वच्छता व्यवस्थापनात अग्रस्थानी असलेल्या इंदोर शहराचा व लगतच्या ग्रामपंचायतींचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली हा अभ्यास दौरा पार पडला. या दौऱ्याचे नियोजन प्रकल्प संचालक विश्वास सिद (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने-भोसले (पाणी व स्वच्छता विभाग) यांनी केले.

या अभ्यास दौऱ्यात संबंधित तालुक्यांतील प्लास्टिक प्रकल्प असलेल्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, बचत गट प्रतिनिधी, विस्तार अधिकारी, उमेद प्रतिनिधी तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांचा समावेश होता.

दौऱ्यादरम्यान इंदोर शहरातील आदर्श घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. तसेच शहरालगतच्या ग्रामपंचायतींच्या स्वच्छता व्यवस्थेचाही अभ्यास करण्यात आला. इंदोरचा हा आदर्श प्रकल्प सातारा जिल्ह्यात प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे मत उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या अभ्यास दौऱ्यातून मिळालेल्या अनुभवाच्या आधारे सातारा जिल्ह्यात कचरा व्यवस्थापनाचा नवा संकल्प राबविण्यात येणार असून, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक शाश्वत व परिणामकारक करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील स्वच्छता चळवळीला अधिक बळ मिळणार असून, सातारा जिल्हा स्वच्छ व पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

दरम्यान, जिल्हास्तरावरून मारुती जाधव (कनिष्ठ प्रशासन अधिकारी), जिल्हा तज्ञ रवींद्र सोनवणे, राजेश भोसले व ब्रह्मदेव जंगम यांनी हा अभ्यास दौरा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments