अवघ्या काही दिवसांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेले आणि सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत उद्योजक एलन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर आता टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्स भारतीय रस्त्यांवर धावणार आहेत. टेस्ला कंपनीने कर्नाटकमधील बंगळुरु येथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनीची नोंदणी केली आहे. कंपनी बंगळुरुत लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती आणि विक्री करणार आहे. कंपनीने बंगळुरुत कामाला सुरुवातदेखील केली आहे. टेस्ला गुजरातमध्येदेखील बिझनेस सुरु करण्यासाठी तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, टेस्ला कंपनीने अजून एक पाऊल पुढे टाकलं आहे. टेस्ला कंपनी आता Bitcoin द्वारे त्यांच्या वाहनांचा व्यवहार करण्याची शक्यता आहे. (
टेस्ला कंपनी लवकरच त्यांच्या शोरुममध्ये Bitcoin द्वारे कार विकणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कोणताही ग्राहक ब्रँड न्यू इलेक्ट्रिक व्हीकल Bitcoin च्या मदतीने खरेदी करु शकतो. आगामी काळात क्रिप्टोकरन्सीचा वापर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत टेस्लाचं हे पाऊल Bitcoin साठी फायदेशीर सौदा ठरू शकतं. टेस्लाने बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तसेच पेमेंटच्या स्वरूपात क्रिप्टोकरन्सी अवलंबण्याची कंपनीची योजना आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, टेस्लाने गुंतवणूक जाहीर केल्यानंतर सोमवारी दुपारी लंडनमध्ये बिटकॉईनचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत.
बिटकॉईनला कायदेशीर मान्यता नसल्यानं भारतात त्याला फारसा उठाव नाही. त्यामुळे भारतीयांना Bitcoin किंवा या क्रिप्टोकरन्सीबद्दल फारशी माहिती नाही. परंतु अमेरिका आणि महत्त्वाच्या युरोपीय देशांमध्ये Bitcoin चा सर्रास वापर केला जातो. क्रिप्टोकरन्सी हे असे चलन आहे जे डिजिटल माध्यम म्हणून खासगीरित्या जारी केले जाते. हे क्रिप्टोग्राफी आणि ब्लॉकचेन सारख्या वितरक लेसर तंत्रज्ञानाच्या (डीएलटी) आधारावर काम करतं.
बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काँप्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं. बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साइट्सवर हे चलन तुम्हाला खरेदी करता येतं. ऑनलाईन वस्तू खरेदी करतो अगदी त्याप्रणाते तुम्ही Bitcoin खरेदी करु शकता. यासाठी क्रिप्टोग्राफीचा वापर केला जातो. क्रिप्टोग्राफी हा माहिती साठवून ठेवण्याचा किंवा सुरक्षित ठेवण्याचा आणि पाठवण्याचा एक सुरक्षित मार्ग आहे, ज्यामध्ये एनक्रिप्टेड कोड वापरला जातो आणि ज्या व्यक्तीला ती माहिती पाठवली आहे ती व्यक्तीच केवळ ती माहिती वाचू शकते. बिटकॉइन हे सध्याचे जगातील सर्वात लोकप्रिय क्रिप्टो चलन आहे. सध्या एका Bitcoin ची किंमत 34.66 लाख रुपये इतकी आहे.