प्रेयसीची माफी मागण्यासाठी पिंपरीतील एका मजनूने वेगळा मार्ग निवडला. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी परिसरात या प्रियकराने ‘शिवडे आय एम सॉरी!’ चे एक दोन नव्हे तर तब्बल ३०० बॅनर लावले आहेत. पोलीसही हे बॅनर पाहून चक्रावले. तपासानंतर त्याने हा प्रताप प्रेयसी मुंबईहून पुण्याला येणार असल्याने केल्याचे उघड झाले आणि त्यानंतर पोलिसांनीही डोक्याला हात लावला.
या बॅनर लावणाऱ्याचा तपास पोलिसांनी सुरू केला असून आपल्या प्रेयसीची माफी मागण्यासाठी नीलेश खेडकर (२५) या मुलाने आदित्य शिंदे या मित्राला हे बॅनर लावायला सांगितल्याचे समोर आले. मित्राच्या मदतीला धावून येत आदित्यने लहान- मोठे असे तब्बल ३०० फलक रस्त्यांवर लावले. प्रेयसीला नीलेश शिवडे या टोपण नावाने हाक मारतो. नीलेश आणि आदित्यने याच नावाचा वापर करुन ‘शिवडे आय एम सॉरी’चे फलक लावले. हे फलक पाहून येणारे- जाणारेही आश्चर्यचकित झाले. अनेकांनी तर सोशल मीडियावर या बॅनरचे फोटो व्हायरल केले. आता या प्रेमवीराला त्याच्या ‘शिवडे’कडून माफी मिळणार का अशी चर्चाही रंगली आहे.
प्रेयसीकडून माफी या प्रेमवीराला मिळो न मिळो पण बेकायदा बॅनरबाजी केल्यामुळे ७२ हजारांचा दंड बसू शकतो. अद्याप हे प्रकरण पोलिसांनी सोडलेले नाही.