आसाममधील चिरांग जिल्ह्यातील बिजनी गावात राहणाऱ्या पार्वती दास या ७० वर्षीय महिलेला NRC च्या कागदपत्रांची पूर्तता करू न शकल्याने त्यांना निर्वासित छावणीत डांबण्यात आलंय. त्यांच्या दोन कागदपत्रांमध्ये आजोबांच्या नावात तफावत आढळल्याने त्यांना कैदेत ठेवण्यात आलंय. पार्वती यांचा मुलगा बिस्वनाथ दास आईला जामीन मिळावा म्हणून न्यायालयाच्या चकरा मारतोय. पण न्यायालयाने जामीन नाकारल्याने तो हताश झालाय.
बिस्वनाथ हा रिक्षा चालक आहे. त्याची कमाईही तुटपुंजी आहे. मात्र आईला जामीन मिळावा यासाठी त्याने आतापर्यंत ७० हजार रुपये वकिलांवर खर्च केलेला आहे. तर त्याचे १ लाखांहून अधिक रुपये गुवाहाटी कोर्टाच्या चकरा मारण्यात खर्च झालेले आहेत. निर्वासित कॅम्पमध्ये डांबण्यात आल्यापासून पार्वती यांची तब्येत बरी नाहीये. बिस्वनाथ म्हणतो, “मला तिला तिथे मरू द्यायचे नाहीये. तिने आपल्या घरी आनंदात राहावं अशी माझी इच्छा आहे.”
पार्वती यांनी रहिवासी पुरावा म्हणून १९४९ पासूनचे वडिलांचे रेशन कार्ड मतदार यादीत असलेले वडिलांचे नाव आणि ग्रामपंचायतीने दिलेला दाखला जमा केला. मात्र ते ग्राह्य धरण्यात आलेले नाहीयेत.
हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे जी लोकं NRC मुस्लिमांकरिता आहे असं मानून उड्या मारताय त्यांच्या लक्षात येत नाहीये की यात केवळ मुस्लिम भरडले जाणार नाहीयेत. अनेकांच्या घरातील स्त्रियांची कागदपत्रे नाहीयेत. ग्रामीण भागातील महिला, आदिवासी महिलांची कागदपत्रेच नसतात. शहरातील अतिहुशार लोकं कागदपत्रांची पूर्तता करण्यात काय अवघड आहे म्हणून फुशारक्या मारताय. त्यांना ग्रामीण भागातील लोकांचे कागदपत्रांचे प्रश्न माहिती नाहीयेत. ग्रामीण भागातील हिंदुत्ववादी आणि भाजप समर्थकांनाही हेच दिवस पाहायला मिळणार आहेत.
आज आसाममधील बिस्वनाथ न्यायालयाच्या चकरा मारतोय. त्यात आर्थिक झळ तर बसलीच आहेच, मात्र मानसिक त्रास झालाय तो वेगळाच. आईची तब्येत खालावल्याने तिचा मृत्यू होण्याची भीतीही आहेच. ज्या शहरी अतिहुशारांना आणि हिंदुत्ववाद्यांना वाटतंय की कागदपत्रे सादर करण्यात अवघड काय आहे त्या बुळ्यांनी एक महिना नंदुरबार, धुळे, विदर्भ किंवा महाराष्ट्रातील एखाद्या खेडे गावात जाऊन किमान १०० लोकांची NRC ला आवश्यक असलेली कागदपत्रे एका महिन्यात जमा करून दाखवावीत. नुसत्या तेथे जाऊन सूचना करू नये, तर तेथील ग्रामीण भागातील लोकांसोबत शासकीय कार्यालयाच्या खेपाही माराव्यात म्हणजे कळेल की इथं बसून आपण केवळ मानसिक नसबंदीचे प्रदर्शन मांडतोय.