नाना पटोले यांच्या एक्झिटनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदावर अप्रत्यक्षपणे दावा सांगितला आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते शरद पवार यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. |
महाविकासआघाडीत काही खात्यांची अदलाबदल होणार असल्याच्या चर्चेने सध्या चांगलाच जोर धरला आहे. यामध्ये आणखी एका उपमुख्यमंत्रिपदाची निर्मिती करून ते काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे. या सगळ्याविषयी काँग्रेस नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. मात्र, केवळ चांगली खाती पदरात पडणार असतील तरच काँग्रेसचे नेते या चर्चेला तयार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या काही क्षणांनंतर लगेचच शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. काँग्रेसमध्ये अंतर्गत दबावामुळे पक्षाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते खुलं झालं आहे. विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडण्यासाठी आता पुन्हा चर्चा होईल, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या पदासाठी आता जोर लावला जाणार, असे संकेत मिळत आहेत.
ठाकरे सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला महत्त्वाची पदं आहेत. काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा जास्त मंत्रिपदं राष्ट्रवादीकडे आहेत. खात्यांबाबतच बोलायचं झाल्यास, उपमुख्यमंत्री, अर्थ, गृह, जलसंपदा, गृहनिर्माण, सहकार, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आरोग्य अशी तगडी मंत्रालयं राष्ट्रवादीकडे आहेत. राष्ट्रवादीकडे तब्बल 16 मंत्रालयं आहेत.
ज्यावेळी महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार झाला, त्यावेळी राष्ट्रवादीला 14 (10 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), शिवसेनेला 12 (8 कॅबिनेट आणि 4 राज्यमंत्रिपदं), तर काँग्रेसला 10 (8 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्रिपदं) मिळाली होती. त्याआधी उद्धव ठाकरेंसोबत तिन्ही पक्षातील प्रत्येकी दोघांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांचे अनुक्रमे 16-14-12 अशी मंत्रिपदं आहेत.
राष्ट्रवादीचे मंत्री
अजित पवार (उपमुख्यमंत्री) – बारामती (पुणे)
दिलीप वळसे पाटील – आंबेगाव (पुणे)
धनंजय मुंडे – परळी (बीड)
अनिल देशमुख – काटोल (नागपूर)
हसन मुश्रीफ – कागल (कोल्हापूर)
राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा (बुलडाणा)
नवाब मलिक – अणूशक्तिनगर (मुंबई)
राजेश टोपे – उदगीर (लातूर)
जितेंद्र आव्हाड – मुंब्रा कळवा (ठाणे)
बाळासाहेब पाटील – कराड उत्तर (सातारा)
दत्तात्रय भरणे (राज्यमंत्री) – इंदापूर (पुणे)
आदिती तटकरे (राज्यमंत्री) – श्रीवर्धन (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) – उदगीर (लातूर)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) – राहुरी (अहमदनगर)