अल्पसंख्याक मंत्री आणि परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर गेलेल्या बड्या नेत्यांची घरवापसी होणार असल्याचा दावा केलाय. नवाब मलिक यांना शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्या भेटीविषयी विचारलं असता त्यांनी शिवेंद्रच नाही, तर राष्ट्रवादी सोडून गेलेले अनेक जण परत येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केलाय. तसेच लवकरच या इच्छुकांचा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती दिली. त्यामुळे राष्ट्रवादीत अनेकांची घरवापसी होणार असल्याचं दिसतंय
भाजपचे साताऱ्यातील आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रविवारी (24 जानेवारी) बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विशेष म्हणजे गेल्या महिनाभरातील शिवेंद्रराजेंनी अजित पवार यांची घेतलेली ही तिसरी भेट आहे. यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. त्यांच्या राष्ट्रवादी वापसीच्याही चर्चा रंगू लागल्यात. त्यातच नवाब मलिक यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर आता पुढे काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील शेतकरी आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “सरकार कायदे करू शकते आणि रद्दही करू शकते. पण लोकशाहीमध्ये हिताचे कायदे केले पाहिजेत. यासाठी डाव्या विचारसरणीचे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. केंद्र सरकारने राज्य मॉडेल अॅक्ट तयार केले असते, तर तो लागू करायचे की नाही हा राज्य सरकारचा अधिकार असतो. पण केंद्र सरकारने हे कायदे राज्यांवर लादण्याचं काम केलंय.”
“आता दीड वर्ष हे कायदे स्थगित करू असं सरकार म्हणतंय. यात केंद्र सरकारला नवीन कायदे करायचे असतील तर त्यामध्ये शेतकऱ्यांना विरोधकांना विश्वासात घेतले पाहिजे. पण आम्ही जे करू तेच स्वीकारले पाहिजे ही मोदींची भूमिका योग्य नाहीये. आम्ही या विरोधात आहोत,” अस नवाब मलिक यांनी नमूद केलं.