टीम इंडियाने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाला धूळ चारुन बॉर्डर-गावसकर ट्रॉफीवर नाव कोरलं. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने चौथा कसोटी सामना तीन विकेट्स राखून जिंकला. या विजयासह भारताने ही मालिका 2-1 या फरकाने जिंकला. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयानंतर ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेनपासून संगमनेरमधील चंदनापुरीपर्यंत गुलालाची उधळण होत आहे.
अजिंक्य रहाणेच्या गावात जल्लोष साजरा होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चंदनापुरी या अजिंक्य रहाणेच्या गावात गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने इतिहास रचल्याने, गावकऱ्यांचा उर अभिमानाने भरुन आला आहे. अजिंक्य रहाणेच्या घरी फटाके फोडून सेलिब्रेशन करण्यात आलं. इतकंच नाही तर पेढे वाटून गावकऱ्यांनी आनंद साजरा केला.
अजिंक्य रहाणे हे चंदनापुरीचं भूषण आहे, त्याची कामगिरी पाहता, अजिंक्य रहाणेला नियमित कर्णधार करावं, अशी मागणी रहाणेच्या गावातील नागरिकांनी केली आहे.
गावकरी काय म्हणतात?
“एक खेडेगावातून गेलेला तरुण संघांचं नेतृत्व करत आहे. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा तो पराभव करतो. ज्या मैदानावर ऑस्ट्रेलिया कधीही हरली नव्हती, तो रेकॉर्ड 38 वर्षानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली तो मोडला गेला आहे, या गावकऱ्यांना आनंद आहे.”
“अजिंक्य रहाणे हे आमच्या गावचे भूषण आहे. ते आमच्या गावचे आहेत, त्यांच्या कतृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भारतीय टीमचे कर्णधारपद त्यांच्याकडे द्यावं. कारण आतापर्यंत कर्णधार असताना टीमचा कधीही पराभव झालेला नाही. त्यामुळे भविष्यात त्यांना कर्णधारपद द्यावं,” अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
100 वर्षीय आजी झेलूबाईंना आनंद
भारतीय संघ जिंकल्याचा आनंद रहाणेच्या कुटुंबात आहे. नातवाने घराण्याचं नाव काढल्याची भावना शंभर वर्षीय आजी झेलूबाईंची आहे. नातवाने नेमकं काय केलंय, याची जरी कल्पना वयस्कर आजीला नसली, तरी काहीतरी भारी घडलंय, असंच त्यांना वाटतंय.
आजी झेलूबाईचा लाडका अजिंक्य
अजिंक्य रहाणे हा आजी झेलूबाई यांचा अत्यंत लाडका नातू आहे. अजिंक्य रहाणेच्या गावातील बंगल्याचं नावही झेलू आहे. झेलू आजीने वयाची शंभरी पूर्ण केली आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत झेलू आजीनेही मतदानाचा हक्क बजावला होता.
सख्खी काकू भारावली
अजिंक्य रहाणेच्या कुटुंबात आनंदोत्सव होत असताना, सख्खी काकू लक्ष्मीबाई सीताराम रहाणेही भारावून गेल्या आहेत. “आम्हाला आनंदी आनंद आहे. गावात पेढे वाटून आम्ही आनंद साजरा केला”, असं त्या म्हणाल्या.