Monday, August 11, 2025
HomeMain News१७ बळी घेणारी अस्पृश्यतेची भिंत पुन्हा उभी

१७ बळी घेणारी अस्पृश्यतेची भिंत पुन्हा उभी

गेल्या वर्षी २ डिसेंबरला तामिळनाडूमधील कोईमतूरनजीक नादुर गावात दलित वस्तीवर एक भिंत कोसळून १७ दलितांचा मृत्यू  झाला होता. ही भिंत पुन्हा उभी करण्यात आली आहे. दलित व सवर्ण असा भेदभाव करणारी ही भिंत शिव सुब्रह्मण्यम या व्यक्तीने दलित वस्तीला लागून उभी केली होती पण या भिंतीला काही आधार नसल्याने ती २ डिसेंबरला दलित वस्तीवर कोसळली होती, त्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता.

आता ही भिंत पुन्हा उभी केल्याने या घटनेची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय अनु.जाती.जमाती आयोगाने कोईमतूरचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडून येत्या १५ दिवसांत अहवाल मागितला आहे.

आयोगाने या अधिकार्यांना एक पत्र लिहिले असून ही भिंत उभी करणार्या व्यक्तीच्या विरोधात कडक कारवाई करण्याची विनंती त्यात करण्यात आली आहे. हे पत्र गुरुवारी प्रसार माध्यमांना उपलब्ध करून देण्यात आले होते.

तामिळनाडूतील नादूर हे गाव चर्चेत आले ते एका उच्चवर्णीय जातीच्या व्यक्तीने जातभेद पाळण्याच्या उद्देशाने दलितांच्या वस्तीला लागून सुमारे २० फूट भिंत बांधली होती. ही भिंत मुसळधार पावसामुळे दलित वस्तीवर पडली व त्यात १७ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर शिव सुब्रह्मण्यमने ही भिंत आपण दलित व सवर्ण वस्ती वेगवेगळ्या असाव्यात या उद्देशाने बांधल्याचे सांगितले होते.

पोलिसांनी या प्रकरणात शिव सुब्रह्मण्यम याला अटक केली होती पण त्यांची २० दिवसांनंतर जामीनावर सुटका झाली होती. पण त्याच्यावर अनु.जाती-जमात अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले नव्हते.

ही भिंत बांधल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी, ‘ही भिंत स्वत:चे घर दलितांच्या घरांपेक्षा वेगळे असावे, या उद्देशाने शिव सुब्रह्मण्यम यांनी बांधली होती आणि या विरोधात आम्ही पोलिसांकडे तक्रारी केल्या होत्या, असे सांगितले होते.

आम्ही एससी-एसटी कायद्यान्वये शिव सुब्रह्मण्यमचा विरोधात गुन्हाही दाखल करण्याचा प्रयत्न केला होता पण पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला नाही, अशीही तक्रार नागरिकांनी केली होती.

पण प्रशासनाने भेदभावाची वागणूक दिल्याच्या निषेधार्थ येथील सुमारे ३ हजाराहून अधिक दलित रहिवाशांनी मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्याची घोषणा केली होती.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments