पुणे पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड आदर्श उमेदवार असून त्यांच्या घराण्याची देशसेवेची परंपरा आहे. प्रश्न धसाला लावण्याची वृत्ती असलेले लाड विचारांशी तडजोड न करता प्रश्न सोडवतात. त्यामुळे पुणे पदवीधर मतदारसंघात परिवर्तन होईल, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी पदवीधरांसाठी काय केले? असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला.पुणे पदवीधर महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अरूण गणपती लाड आणि शिक्षक मतदारसंघाचे जयंत आजगावकर यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी कार्यकर्ता बैठकीत पाटील बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की, “सरकारने तिजोरी मोकळी झाल्यानंतरही कायम अनुदानित शिक्षकांच्या पुढील अनुदानाचा निर्णय घेतला. तसेच कोरोनाच्या काळात पावलोपावली भाजपाने राजकारणाची संधी साधली. एक बेजाबदार विरोधी पक्ष कसा असू शकतो? याचे उदाहरण भाजपने दिले. पदवीधरचे अधिकृत उमेदवार अरूण लाड हे प्रामाणिक, स्पष्ट वक्ता आणि विचारावर श्रद्धा असणारे क्रांतिकारकी घराण्यांची परंपरा असलेले उमेदवार आहेत. ते पदवीधरांच्या प्रश्नासाठी उभे राहतील, पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी चंद्रकांत पाटील किती पुढे होते?” असा प्रश्नही यावेळी उपस्थित केला.
‘पुणे येथील काही भागातील यादीमध्ये शंभर एक मतदारांच्या नावासमोर एकच मोबाईल नंबर आणि दिलेल्या पत्त्यावर तो मतदार रहात नाही, अशी बोगस मतदार नोंदणी झाली आहे. त्यासंबंधी निवडणुक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे, अशी माहितीही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिली.
ताकदीच्या माणसाला त्रास कसा द्यायचा? हे भाजपकडून शिकावे !
“दीपक मानकर यांनी अत्यंत जिव्हाळ्याने ही कार्यकर्ता बैठक आयोजित केली. बघता-बघता या बैठकीला सभेचे स्वरुप आले, आपणाकडे असलेले संघटन कौशल्य आम्ही जाणतो. पण एका ताकदीच्या माणसाला बदनाम कसे करायचे, हे भारतीय जनता पक्षाकडून शिकावे असा टोला”, यावेळी जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.