जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका प्रा. पुष्पाताई भावे मागील काही दिवसांपासून खूप आजारी होत्या . प्रभावी वक्त्या ,परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दीर्घ आजाराने प्राणजोत मालवली . विचारवंत आणि लेखिका प्रा . भावे यांचा विद्याधार्थी दशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळणींशी संपर्क होता . मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एलिफिन्सटन कॉलेज मधून एम . ए . ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या . पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारीक बैठक असलेल्या पुष्पाताई यांनी गेल्या पाच – सहा दशकातील सगळ्या प्रगतिशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले . संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन ,दलित पँथरची चळवळ ,एक गाव ये पाणवठा चळवळ , हमाल पंचायत ,देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी ,कामगार ,आदिवासी ,दलित आदी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दिला . तसेच त्या उत्तम लेखिका सुद्धा होत्या . डॉ . श्रीराम लागू यांच्या अमृत मोहोत्सवानिमित्त पुष्पा ताई च्या संपादनाखाली निघालेला “आम्हाला भेटलेले डॉ . श्रीराम लागू ” हा ग्रंथ त्यांच्या वेगळ्याच पैलूचे दर्शन घडवतो .