राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून आता एखाद्या शिक्षकाने विनंती केली तरच बदली करण्यात यावी, असे निर्देश ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सं.ना. भंडाकर यांनी सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटात शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्राम विकास विभागाकडून जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ऑफलाइन पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आले होते. बदल्यांसाठी पात्र असलेल्या १५ टक्के शिक्षकांची माहिती संकलित करून १० ऑगस्टपर्यंत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन यापूर्वीच करण्यात आले होते.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबवायची कशी, असा प्रश्न होता. कोरोना संसर्गामुळे बदल्यांची प्रक्रिया रद्द करण्याची मागणीही शिक्षक संघटनांकडून करण्यात येत होती. त्यामुळे ही बदल्यांची प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.
बदली प्रक्रिया रद्द करतानाच गैरसोयीच्या ठिकाणी कार्यरत शिक्षकांच्या जिल्हांतंर्गत बदल्या संबंधित शिक्षकांनी विनंती केली तरच करण्यात याव्यात, असे निर्देशही ग्रामविकास विभागाने राज्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.