राज्यात कोरोनाचे अभूतपूर्व संकट असतांना ‘रिकामटेकड्या लोकांच्या डोक्यातच सरकार पाडण्याचा विचार येवू शकतो’ असे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. राज्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या ५० हजारांच्या वर गेली असतांना या कठीण प्रसंगी राजकारण करणाऱ्या भाजपावर शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे.
राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकार कोरोनाच्या संकटाशी लढत असतांना भाजपा मात्र सत्तेत येण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे, हे एकूणच आश्चर्यचकित करणारं आहे. सध्या राज्यासाठी हि कठीण वेळ आहे, याप्रसंगी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्रपणे काम करत आहोत, राज्य सरकार कोरोनाशी लढण्यासाठी सक्षम आहे, मात्र विरोधी पक्षाने अश्यावेळी सत्तेत येण्यासाठी आंदोलन करणे, राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी करणे दुर्दैवी आहे असे शरद पवार म्हणाले.
राज्यातील जनता सध्या कोरोनामुळे त्रस्त आहे, त्यांचे दुखः कमी करण्याचे आपले प्रयत्न असले पाहिजे, मात्र जे रिकामटेकडे राजकारणी आहेत, त्यांच्या डोक्यात सरकार पाडण्याचा विचार येत आहे, याकरिता ते राज्यपालांची वारंवार भेट घेत आहेत असे शरद पवार म्हणाले.