रविश कुमार (लेखक एनडीटीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संपादक आहेत.)
पाकिस्तानमध्ये राहणारा हिंदू, शीख कधीही भारतात येऊ शकतात, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर सभेत सांगितले होते. त्यापूर्वी ‘पाकिस्तानमध्ये राहणारे हिंदू आणि शीख बांधव त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा भारतात आले तरी त्यांचे स्वागत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही म्हटले होते. पंतप्रधान आणि गृहमंत्री जे सांगत आहेत गांधीजीजींनी खरेच तसे म्हटले होते का?
‘ आमच्या तीन शेजारी देशांतील जे अल्पसंख्यांक, जे अत्याचारामुळे पळून भारतात येण्यास मजबूर झाले आहेत त्यांना या कायद्यात थोडी मदत दिली आहे, सवलत दिली आहे, काही सूट दिली आहे आणि ही सवलतही मोदींचा विचार आहे, असे मानण्याची गरज नाही. रातोरात मोदींना हा विचार आला आणि आणि मोदींनी ते केले, असेही नाही. ही सवलत महात्मा गांधींच्या भावनेला अनुरुप आहे. महात्मा गांधीजी म्हणाले होते, कमीत कमी त्या लोकांनी तरी जे लोक महात्मा गांधींच्या संबंधाने देशावर बोलतात आणि आजही गांधीजी आडनावाचा फायदा उचलण्याचा गप्पा मारतात, त्यांनी तरी कान उघडून ऐकावे, गांधीजींनी म्हटले होते, मोदींना माना अगर न माना अरे गांधीजीला तरी माना. महात्मा गांधीजींनी म्हटले होते की, पाकिस्तानमध्ये राहणारे हिंदू आणि शीख मित्रांना जेव्हा वाटेल की आपण भारतात यायला हवे, तर त्यांचे स्वागत आहे. हे मी म्हणत नाही, पूज्य महात्मा गांधीजी म्हणत आहेत.’
हा उतारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील आहे. जे त्यांनी 22 डिसेंबर 2019 रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर केले होते. त्या सभेच्या एक महिन्यानंतर आमचे पंतप्रधान महात्मा गांधीजींच्या बाबतीतही खोटे बोलू शकतात, हे सांगताना मला दुखः होत आहे.
खोटे बोलायला एक सेकंद लागत नाही, परंतु ते खोटे पकडायला अनेकदा एक दशकही लागू शकते. हिंदू आणि शीख बांधव जेव्हा वाटेल तेव्हा पाकिस्तानातून भारतात येऊ शकतात, असे गांधीजींनी कधीही म्हटले नव्हते. उलट पाकिस्तान आणि हिंदुस्तानातील अल्पसंख्यांकांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढतच मरण पत्करले तर त्यात त्यांना जास्त आनंद होईल, असे गांधीजी वारंवार सांगत राहिले.
गृहमंत्री अमित शाह यांनी तर बिहारच्या वैशालीतील सभेत लिहून आणले होते आणि वाचून दाखवत होते की, गांधीजींनी असे 26 सप्टेंबर 1947 रोजी म्हटले होते. ते म्हणाले, महात्मा गांधीजींनी 26 सप्टेंबर 1947 रोजी म्हटले होते की ‘पाकिस्तानमध्ये राहणारे हिंदू- शीख कधीही भारतात येऊ शकतात. त्यांना नोकरी आणि जीवनातील सुख मिळाले पाहिजे, नागरिकत्व मिळाले पाहिजे. हे स्वतंत्र भारताचे पहिले कर्तव्य आहे.’
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह सांगत आहेत, तसे महात्मा गांधीजींनी खरेच म्हटले होते का?
माझ्याकडे गांधीजींच्या प्रार्थना प्रवचनांचे एक संकलन आहे. अशोक वाजपेयी यांनी ते संकलित केले आहे. त्यात 1 एप्रिल 1947 पासून 29 जानेवारी 1948 या कालावधीतील गांधीजींची सर्व प्रार्थना प्रवचने समाविष्ट आहेत. रजा फाऊंडेशन आणि राजकमल प्रकाशनाने संयुक्तपणे हिंदीत ते प्रकाशित केले आहे. याच पुस्तकातील 5 जुलै 1947 रोजी गांधीजींनी दिलेल्या प्रवचनाचा हा उतारा पहा-
‘परंतु पाकिस्तानची खरी परीक्षा तर ही असेल की, तो आपल्या येथे राहणारे राष्ट्रवादी मुसलमान, ख्रिश्चन, शीख आणि हिंदू आदिशीं कसा व्यवहार करतो. शिवाय मुसलमानांमध्येही अनेक पंथ आहेत. शिया आणि सुन्नी तर प्रसिद्ध आहेत. आणखीही पंथ आहेत, त्यांच्याशी कसा व्यवहार केला जातो हे पाहू. हिंदूशी ते संघर्ष करतात की मैत्री करून राहणार?’
या दिवशी गांधीजी स्पष्टपणे म्हणतात की, पाकिस्तानात फक्त शिया आणि सुन्नी नाहीत. मुसलमानात अनेक पंथ आहेत. या पंथांशी पाकिस्तान कसा व्यवहार करतो, हे गांधीजी पाहू इच्छितात. याच मुद्द्यावर संसदेतील चर्चेत विरोधी पक्षांनी सरकारला सांगितले होते की, धर्माचे नाव जोडून अशा अन्यायपीडित लोकांसाठी आपण मार्ग बंद करत आहात. हे संविधान आणि गांधीजींच्या भावनेला अनुरूप नाही.
पंरतु आजकाल गांधीजी कोण वाचतो असे सरकारला वाटले. हिंदी वृत्तपत्रांत तर जे आम्ही बोलू तेच छापून येणार. वाचणारा तेच खरे मानून चौकांत चर्चा करेल की मोदीजी जे करत आहेत, ते देशासाठी करत आहेत. तसे झालेही. मोदी आणि शाह गांधीजींना चुकीच्या पद्धतीने सादर केले आहे, हे हिंदी वृत्तपत्रे आताही छापणार नाहीत.
5 जुलै 1947 रोजीच्या प्रवचनात गांधीजी सर्वप्रथम नव्या पाकिस्तानात राष्ट्रवादी मुसलमानांशी होणाऱ्या व्यवहाराचा उल्लेख करतात. आता पाकिस्तानात राहणारा राष्ट्रवादी मुसलमान कोण? असा प्रश्न निर्माण होतो.
5 जुलै 1947
‘परंतु जर सिंध किंवा अन्य ठिकाणाहून लोक भीतीपोटी आपली घरेदारे सोडून येथे आले तर आपण त्यांना पळवून लावायचे? जर आपण असे केले तर आपणाला हिंदुस्तानी कोणत्या तोंडाने म्हणतील? आम्ही जय हिंदचा नारा कसा द्यायचा? हाही तुमचा देश आहे आणि तोही तुमचा देश आहे, असे म्हणत त्यांचे स्वागत करा. अशा पद्धतीने त्यांना ठेवायला हवे. जर राष्ट्रीय मुसलमानांनाही पाकिस्तान सोडून यावे लागले तर त्यांनीही यावे. हिंदुस्तानी म्हणून आपण सगळे एकच आहोत. जर हे घडणार नसेल तर हिंदुस्तान घडणार नाही.’
12 जुलै 1947
माझ्याकडे आजकाल खूप मुसलमान भेटायला येतात. तेही पाकिस्तानला घाबरतात. ख्रिश्चन, पारसी आणि अन्य गैरमुसलमान घाबरले तर ते समजण्यासारखे आहे. परंतु मुसलमानांनी का घाबरावे? ते म्हणतात की आम्हाला देशद्रोही क्वीसलिंग (गद्दार) समजले जाते. पाकिस्तानात हिंदूंना जो त्रास होईल, त्यापेक्षा जास्त त्रास आम्हाला होईल. पूर्ण सत्ता मिळतात आमचे काँग्रेससोबत राहणे शरियतनुसार गुन्हा मानला जाईल.
इस्लामला हे मान्य असेल तर ते मला मान्य नाही. राष्ट्रीय मुसलमानांना क्वीसलिंग कसे काय म्हटले जाऊ शकते? जिन्ना साहेब गैरमुसलमान अल्पसंख्यांकांचे रक्षण करतील, तसेच या मुसलमानांनाही पूर्ण संरक्षण देतील, अशी मला आशा आहे.
12 जुलैच्या प्रवचनातून हे स्पष्ट होते की, जे गांधीजींच्या मार्गाने चालतात, ते राष्ट्रवादी मुसलमान आहेत. काँग्रेसशी संबंधित आहेत, मात्र त्यांना भीती आहे की नव्या पाकिस्तानात काँग्रेससोबत राहणे शरियतनुसार गुन्हा मानले जाईल. त्याला काँग्रेस समर्थक मुसलमान आणि मुस्लिम लीग समर्थक मुसलमानांतील संघर्षाची पार्श्वभूमी आहे.
इतिहासकार यास्मीन खान यांनी आपल्या ‘द ग्रेट पार्टिशन मेकिंग ऑफ इंडिया अँड पाकिस्तान’ या पुस्तकात विस्ताराने उल्लेख केला आहे. जो निवडून येईल, त्याच्याशीच स्वातंत्र्याबाबत चर्चा करण्यात येईल, असे ब्रिटिश सरकारने निश्चित केले होते. त्यामुळे डिसेंबर 1945 ते मार्च 1946 दरम्यान निवडणुका घेण्यात आल्या, हे आपण जानताच.
या निवडणुकीत मुसलमानांसाठी जागा राखीव होत्या. तेथे मुसलमानच मुसलमान उमेदवार निवडून देऊ शकत होते. त्या जागांवर मुस्लिम लीगचे मुसलमान आणि काँग्रेसचे मुसलमान यांच्यात जबरदस्त संघर्ष होतो. मुस्लिम मोहल्ल्यांत काँग्रेसी मुसलमान एकटे पडले. त्यांनी लीगच्या मुसलमानांकडून मार खाल्ला तरीही ते गांधीजींच्या मार्गावर अढळ राहिले. त्यांना लीगचे समर्थक मौलाना काफीर म्हणतात.
जमियत उल- उलेमाच्या अध्यक्षांनी 1945 मध्ये एक फतवा काढला होता. मोहम्मद अली जिन्नांना काफिर-ए- आजम म्हटले होते. गांधीजींच्या दृष्टीने जिन्नांना नाकारतात, तेच राष्ट्रवादी मुसलमान आहेत. भारतात आणि पाकिस्तानातही!
तो असा काळ होता की, राष्ट्रवादी मुसलमान जिन्नांना नाकारण्याबरोबरच आपल्यात घरात आणि नातेवाईकांशी संघर्ष करत होता. फाळणीनंतर बरेचसे राष्ट्रवादी मुसलमान पाकिस्तानातच राहिले. याचा अर्थ त्यांना जिन्नांच्या पाकिस्तानवर विश्वास होता, असा नव्हे. हे तेच मुसलमान आहेत, जे गांधीजींजवळ येऊन सांगत आहेत की त्यांना जिन्नांच्या पाकिस्तानात भीती वाटते.
बरेचसे मुसलमान जिन्नांचा पाकिस्तान नाकारून भारतातही आले. ते आले नसते तर दिलीप कुमारसारखा शानदार अभिनेता हिंदी चित्रपटसृष्टीचा सरताज बनला नसता. येणे आणि न येण्यादरम्यान एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की, जेव्हा फाळणी झाली तेव्हा लोकांची फाळणी होणार नाही, लोक पुन्हा एक होतील, असे अनेकांना वाटले.
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह आपल्या भाषणांत जिन्नांशी लढणाऱ्या राष्ट्रवादी मुसलमानांनाच नाकारतात. त्यांचा साधा उल्लेखही करत नाहीत. त्यांच्या दृष्टीने सर्व मुसलमान कपड्यांवरून ओळखले गेले पाहिजे आणि ते कपडेही त्यांच्या दृष्टीने एकसारखेच आहेत.
मात्र या देशातील मुसलमान धोतीही घालतात. 25 लाखांचा नसेलही पण सूट आणि शेरवानीही घालतात. संविधानाच्या कोणत्याही कल्पनेत राष्ट्रवादी मुसलमानांना नाकारून गांधीजींचा विचार केला जाऊ शकतो का? केलाच जाऊ शकत नाही, असे माझे उत्तर आहे.
वैशाली जिल्ह्यात गृहमंत्री अमित शाह यांनी गांधीजींना उद्धृत करून तारीखही सांगितली की त्यांनी 26 सप्टेंबर 1947 रोजी म्हटले होते. मी अशोक वाजपेयींव्दारे संकलित प्रार्थना प्रवचनातील 26 सप्टेंबर 1947 रोजीचे प्रवचनही वाचले. गृहमंत्र्यांनी तारीख तर खरी सांगितली मात्र खरे भाषण वाचले नाही.
या दिवशी गांधीजी आपल्या प्रवचनात पाकिस्तानातून भेटीला आलेले वैद्य गुरूदत्त यांच्याशी झालेली बातचीत सांगतात. गुरूदत्त गांधीजींना म्हणतात की, मी तुमचे ऐकले नाही, मी आलो. तेथील सरकारवर परिणाम होत नाही. आम्ही हिंदू- मुसलमान कालपर्यंत मित्र होतो, आज कोणावरही विश्वास ठेवत नाहीत.
गांधीजींची कोणती गोष्ट गुरूदत्त यांनी ऐकली नाही? कारण गांधीजी सांगत होते, जो जेथे आहे त्यांनी आपल्या सरकारच्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा. मग भलेही संघर्ष करताना मरण आले तरी त्यांना वाईट वाटणार नाही.
या दिवशीच्या प्रवचनात गांधीजी एका शब्दाचा उल्लेख करतात. पंचम स्तंभ. जे लोक शत्रूला सहकार्य करतात त्यांना पंचम स्तंभ म्हणतात. गांधीजींच्या 26 सप्टेंबर 1947 रोजीच्या प्रार्थना सभेतील प्रवचनाचा उल्लेख आवश्यक आहे. म्हणजे हिंदू आणि शीखांनी जेव्हा वाटेल तेव्हा पाकिस्तानातून भारतात यावे, असे गांधीजींनी कधीही म्हटले नव्हते, हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनाही कळेल.
‘जर पाकिस्तानमध्ये हिंदूला आणि भारतात मुसलमानाला पंचम स्तंभ म्हणजे गद्दार समजले जाणार असेल, विश्वासार्ह बिल मानले जाणार नसेल तर ते चालणार नाही. जर ते पाकिस्तानात राहून पाकिस्तानानशी अनास्था दाखवत असतील तर आम्ही एका बाजूने बोलू शकत नाही.
जर आम्ही येथे जेवढे मुसलमान राहत आहेत, त्यांना पंचम स्तंभ ठरवून टाकणार असू तर तिकडे पाकिस्तानमध्ये जे हिंदू, शीख राहत आहेत, मग त्या सर्वांनाही पंचम स्तंभ ठरवून टाकणार आहोत ? हे चालणार नाही.
जे तिकडे राहतात, जर ते राहू इच्छित नसतील तर येथे आनंदाने यावे. त्यांना काम देणे, त्यांना आरामत ठेवणे आमच्या केंद्र सरकारचा परम धर्म होऊन जातो. परंतु असे होऊ शकत नाही की, त्यांनी तेथे बसून रहावे आणि छोटे हेर बनावे, काम पाकिस्तानचे नव्हे, आमचे करावे. हे मान्य होणारी गोष्ट नाही आणि मी त्यात सहभागी होणार नाही.’
गांधीजींनी पाकिस्तानात अल्पसंख्यांक हिंदू आणि भारतात अल्पसंख्यांक मुसलमानांच्या राष्ट्रीयतेवर शंका घेण्याच्या कोणत्याही गोष्टीला विरोध केला होता. मुसलमानांचे कपडे लक्षात ठेवा, असे गांधीजींनी कधीही म्हटले नव्हते.
गांधीजींनी आपल्या 26 सप्टेंबर 1947 च्या प्रवचनाच्या शेवटी आणखी एक विचार मांडला होता, जो कदाचित अमित शाह यांनी वाचला नाही. सत्यमेव जयते, नानृतम. सत्याचा विजय होतो, असत्याचा विजय होत नाही.
त्यांनी असेही म्हटले होते की, ‘ जर पाकिस्तानातील सर्व मुसलमान घाणेरडे आहेत, असे मानले गेले तर त्याचे आम्हाला काय? मी तर तुम्हाला सांगेन की हिंदुस्तानला समुद्रच ठेवा. त्यातून सर्व घाण वाहून जाईल. कोणी घाण केली म्हणून आपणही घाण करावी, हे आपले काम असूच शकत नाही.’
पंतप्रधान मोदींनी गांधीजींची ही प्रार्थना प्रवचने वाचत वाचतच त्यांच्याशी ‘मन की बात’ करावी, अशी माझी इच्छा आहे. त्यांची प्रवचने वाचून हात थरथरू लागतील. ओठ थरथरू लागतील. जनता आणि नेत्यांकडून हारल्यानंतरही गांधीजी कसे उठून उभे राहिले, हे ते पाहू शकतील. दिल्लीहून नोआखली तर कधी बिहारला जात आहेत. आपल्या अहिंसा आणि सत्याचे प्रयोग पुन्हा करत आहेत. त्यांना पुन्हा उभे करण्याचा त्यांचा शेवटचा प्रयत्न त्यांचे प्राण घेतो.
जे प्राण घेतात त्याला देशभक्त म्हणणारीला पंतप्रधान मोदी भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी देत आहेत. त्यांच्या पक्षाचा एक नेता अमिताभ सिन्हा टीव्ही टुडे चॅनलच्या चर्चेत कन्हैयांच्या प्रश्नाच्या उत्तरात मी गोडसेचा निषेध करणार नाही, असे सांगतो.
गांधीजींची ही प्रवचने वाचल्यानंतर पंतप्रधान मोदी त्याच रामलीला मैदानावर जातील आणि या मैदानाशी रामाचे नाव जोडले गेले आहे. रामाचे नाव सत्याशी जोडले गेले आहे. गांधीजींचे नावही सत्याशीच जोडले गेले आहे. मी राम आणि गांधीजी दोघांची नावे घेऊन खोटे सांगितले आहे. रविश कुमार खरे सांगतो आहे. मी भारताच्या 130 कोटी जनतेची माफी मागतो असे म्हणतील, असा मला विश्वास आहे.