| सरकारने ८ किंवा ९ फेब्रुवारीपर्यंत लोकपाल नियुक्तीबाबत निर्णय घेतला नाही तर आपल्याला देण्यात आला पद्मभूषण पुरस्कार परत करणार, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला दिलाय. कायदा करून ५ वर्षे उलटून गेली तरी सरकार लोकपाल नेमण्यास तयार नाही. त्याचप्रमाणे लोकपालची नियुक्ती होत नाही तोपर्यंत आपण उपोषण सोडणार असल्याचे देखील अण्णांनी स्पष्ट सांगितले आहे.
अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धी या आपल्या गावी ३० जानेवारीपासून लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठीच्या आंदोलनाला सुरुवात केली असून आज (३ फेब्रुवारी) त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. या उपोषणामुळे अण्णा हजारेंची प्रकृती बिघडली असून त्यांच्या यकृतावर परिणाम झाला आहे. तसेच त्यांना रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. तसेच जर त्यांचे उपोषण असेच सुरु राहिले तर त्यांच्या किडनी आणि मेंदूवर देखील याचा वाईट परिणाम होईल, असे डॉक्टरांनी सांगितले आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज अण्णांची भेट घेतली. या बैठकीत देखील कोणताही तोडगा निघाला नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील अण्णा हजारेंची भेट घेतली. मात्र अण्णा हजारे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मात्र, या उपोषणाकडे सरकारकडून केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे अण्णा हजारेंच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.