अजय-अतुल या जोडीने संगीतप्रेमींना एकाहून एक सरस आणि हिट गाणी देऊन अक्षरशः याड लावले असल्यामुळेच की काय मराठी चित्रपटसृष्टीसह बॉलीवुडमध्येही या जोडीचा डंका वाजत आहे. अजय-अतुल या संगीतकार जोडीने हिंदी चित्रपटांच्या गाण्यांनाही सुमधुर चाली दिल्या. अजय-अतुल या जोडीने कधी प्रेमाच्या रंगात दंग व्हायला लावणाऱ्या रोमँटिक तर कधी लहानथोरांना थिकायला लावणारे धमाकेदार संगीत दिले.
बॉलीवुडच्या रसिकांना वेड लावण्यासाठी आता पुन्हा एकदा ही जोडी येत असून अजय-अतुल ‘शमशेरा’ या आगामी चित्रपटाचे संगीत देत असल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी आले होते. आता अजय-अतुल ही शमशेरापाठोपाठ आणखी एका नव्या बिग बजेट हिंदी चित्रपटासाठी जोडी संगीत देत आहे. अजय-अतुल दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानीपत’ या आगामी चित्रपटाला संगीत देणार आहेत. या चित्रपटाच्या संगीत निर्मितीची प्रक्रिया सध्या सुरु असून दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यासोबत बसून अजय-अतुल हे या चित्रपटाच्या संगीतासाठी काम करत असल्याचा फोटो सध्या समोर आला आहे.
या फोटोत गोवारीकर हे अजय-अतुलचे संगीत लक्षपूर्वक ऐकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानीपत’ हा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. आशुतोष गोवारीकर पानीपत या चित्रपटाला भव्यदिव्य करण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच या चित्रपटाला साजेसे संगीत देण्याची जबाबदारी अजय-अतुलवर त्यांनी सोपवली आहे.