अलीकडे शासकीय व संस्थाच्या बदल्यांची लगबग सुरु झाली आहे .या बदल्या म्हणजे कर्मचाऱ्यांचा बदला तर घेत नाहीत ना अशीच भावना या कर्मचाऱ्यांच्या मध्ये निर्माण झाली आहे .बदल्यांच्या महानाट्यामध्ये अधिकारी व संस्थेमधील पदाधिकाऱ्यांची मात्र चांदी होताना दिसत आहे .
मोठमोठ्या संस्थानमधून केलेल्या बदल्या या कोणत्याही प्रकारची सोय न पाहताच सरंजामशाही पद्धतीने केल्या जातात.त्यामध्ये कुणाला जिल्ह्याबाहेर तर कुणाला जिल्ह्यातच , त्यातच जर मर्जीतील कर्मचारी असेल तर त्याला मात्र सोयीची जागा देण्यात येते .परंतु ज्यांचा कुणाचा वशिला नाही ते मात्र जिथे टाकतील तिथे मुकाट्याने हजर होतात .या मध्ये मुलांची,कुटुंबाची कोणतीच फिकीर केली जात नाही .अशा गैरसोयीच्या ठिकाणी कुटुंबापासून दूर राहणारे कर्मचारी मुकाट्याने सहन करीत असतात .अशा ठिकाणी त्यांच्याकडून कामही दर्जेदार होईल याची खात्री नसते .तो राग विद्यार्थी,नागरिक यांच्यावरती काढण्यास मागे पुढे पाहत नाहीत .
मोठमोठ्या संस्थानमधून जे अधिकारी पदावर काम करतात .ते मालक असल्यासारखेच वागत असतात .खरे तर आपणही त्या संस्थेचे कर्मचारी आहोत याचा जणू त्यांना विसरच पडला आहे असे दिसते .
या बदल्याच्या उलाढाली मध्ये करोडो रुपयांची उलाढाल होते .ज्यांना सोईची बदली हवी असेल ते मागतील तेवढे पैसे देऊन आपली सोय करून घेतात .या मध्ये अधिकारी पदाधिकारी मात्र मालामाल होतात .बदल्या म्हणजे पैसे उकळण्याचा अलीकडे धंदाच झाला आहे .या बदल्या करून हे लोक बदला तर घेत नाहीत ना अशी भावना सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या मध्ये झाली आहे .



