प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यभरात आज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याला पाच हजार रुपये दंडाची पावती दिली जात आहे. पुण्यात महापालिकेच्या पथकाकडून सकाळपासून 73 कारवाया करत तीन लाख 69 हजार रुपयांची वसुली केली.
सांगलीतही प्लास्टिक बाळगणाऱ्या दुकानावर महापालिकेने छापे टाकून हजारो रुपयांचा प्लास्टिक आणि थर्माकोलचा साठा हस्तगत करून दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने आपल्या 15 भरारी पथकाच्या माध्यमातून आज जवळपास 50 हजार रुपये दंड वसूल केला, तर अंदाजे एक टन प्लास्टिक पिशवी आणि अन्य प्लास्टिक जप्त केलं आहे.
यामध्ये सांगली शहरात मुख्य बाजार पेठेत छापे टाकून अनेक दुकानातून प्लास्टिक तसेच थर्माकोलचे साठे जप्त करण्यात आले आहेत. प्लास्टिक विरोधी कारवाई उद्यापासून अधिक तीव्र होणार असून मंगल कार्यालये, मटण आणि चिकन मार्केट, मंडई, बाजार येथेही तपासणी करण्यात येणार आहे.