पक्ष संघटनेत काँग्रेसने आज मोठे फेरबदल केले असून महाराष्ट्राचे पक्षाचे प्रभारी मोहनप्रकाश यांची उचलबांगडी करत लोकसभेतील पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती केली आहे. खर्गे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असून काँग्रेसने हा महत्वपूर्ण बदल आगामी लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला आहे. या बदलाबरोबरच जे डी सिलम आणि महेंद्र जोशी यांना पक्षाचे सरचिटणीस आणि शशिकांत शर्मा यांना सहसरचिटणीस म्हणून पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी नियुक्त केले आहे.
सीमावर्ती भागातील मल्लिकार्जुन खर्गे असून महाराष्ट्राची त्यांना चांगली जाण आहे. तसेच त्यांचे मराठीही चांगले आहे. पक्षाला त्याचा फायदा होऊ शकतो. कारण येत्या काळात महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असल्यामुळे पक्षनेतृत्वाकडून हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
मागील ७ ते ८ वर्षांपासून मोहन प्रकाश हे महाराष्ट्राचे काम पाहत होते. सुरूवातीला ए के अँटोनी हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी असताना त्यांनी सहप्रभारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण पक्षाला त्यांच्या कार्यकाळात पाहिजे तसा बदल दिसून आला नसल्याचे बोलले जाते. खर्गे यांच्या नियुक्तीचा पक्षाला राज्यात फायदा होईल असे बोलले जाते.