Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रजागतिक मातृदिन विशेष : आई, खरं सांग तू काय ‘काम’ करते?

जागतिक मातृदिन विशेष : आई, खरं सांग तू काय ‘काम’ करते?

‘चांगलं वाईट नसतं काही ‘‘प्रेम’’ महत्वाचं’ असं सांगणारी बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या कांताबीबीने अनिलला (नाव बदलले आहे) मोठ्या हिंमतीने वाढवले. जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने आवर्जून वाचावा असा एका मातेचा संघर्ष.

रघु कोठ्यावर रात्री अपरात्री केव्हाही यायचा. दारु पिलेल्या अवस्थेत. झोकांडे जायचे त्याचे सारखे, शिवीगाळ करायचा. प्रसंगी मारायचा. हे त्याच रुप मला नवीनच होतं. लग्नाच्या अगोदर त्याचं प्रेमाने बोलणं, त्याने दाखविलेली स्वप्नं, याची राखरांगोळी व्हायला फार वेगळा लागला नाही. सात महिन्याची गर्भार होते. अशा परिस्थितीत तो मला सोडून गेला ते कायमचाच. सगळं संपलं होतं. एकादा त्या वस्तीतून सुटून भविष्याची आस उराशी बाळ्गली खरी. पण जाणार कुठे पोटूशी  ‘‘जीव’’ होता. त्यासाठी करावं लागलं सगळं.

‘चांगलं वाईट नसतं काही  ‘‘प्रेम’’ महत्वाचं’ असं सांगणारी बुधवार पेठेतील देहविक्री करणाऱ्या  कांताबीबीने अनिलला (नाव बदलले आहे)  मोठ्या हिंमतीने वाढवले. शिक्षणाचे महत्व जाणून घेवून त्याला मोठा इंजिनिअर केलं. सीइओपी महाविद्यालयात अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला अनिल आता एका मोठ्या कंपनीत कामाला आहे. हाताशी नुकतीच नोकरी आली असताना त्याचा फायदा घेवून अनिलने आता आपल्या प्रगतीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्याचा पुढे एमबीए करण्याचा विचार असल्याचे कांताबीबी सांगते. आपल्या मुलाला आपण करीत असलेल्या कामाविषयी काही माहिती नाही. काय सांगणार त्याला? बाई चार दाराच्या आत असते तोपर्यंत सुरक्षित म्हणायची. एक दा का ती चौकट मोडली की मग तिला ओरबडण्यासाठी आजुबाजुला लांडगे बसलेले असतात. आपल्याकडे पुरुषाने काहीही केलं तरी ते माफ असते. भले का त्याने चार बायांना पोटं आणली तरी तो पुरुष म्हणायचा. लग्नाच्या आणाभाका घ्यायच्या. गोडी गुलाबीने संसार करु असं सांगायचं. एकदा का पाहिजे ते मिळालं मन भरलं की मग सोडून जायचं. असे पुरुष जेव्हा पुन्हा कोठ्यावर येतात तेव्हा मात्र त्यांच्यापेक्षा आपण बरे. असे वाटू लागते. कांताबीबीचं मुळ गावं नेपाळमध्ये आहे. घरी कमालीची गरीबी, आई लवकरच गेली. वडिलांनी सांभाळलं. शेतीवाडी करुन जे मिळेल ते कमवायचं आणि त्यावर घर चालवायचं.  वडिल गेल्यानंतर एकटी पडलेली कांताबीबी एका मैत्रीणी बरोबर मुंबईला आली. त्यानंतर पैशाकरिता तिला वेश्याव्यवसायात यावं लागलं. पुण्यात गेल्या 25 ते 30 वर्षांपासून राहणा-या  कांताबीबीने मुलाला शिक्षण देण्यात कुठलीही कसूर केली नाही.

अनिलचा सांभाळ एका कुटूंबाने केला. खरं तर तो अडीच वर्षांचा असतानाच त्याला पाळणाघरात ठेवले. कांताबीबीने आपण करीत असलेल्या व्यवसायाची त्याला जराही कुणकुण लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. शाळेत असल्यापासूनच अनिल फार हुशार होता. त्याची हुशारी पाहून काहीही झालं तरी याला शिकवून मोठा माणूस करायचा. अशी जिद्द मनाशी बाळ्गली. ती पूर्ण करुन दाखवली. ज्यावेळी त्याला भेटायला जायची तेव्हा त्याने मला अनेकदा आई तु काय काम करते? असा प्रश्न विचारला. चार घरची भांडी धुणी करते. असं सांगुन वेळ मारुन न्यायची. उत्तर देताना काळजात कालवाकालव होते खरी, पण करणार काय? अशी भावना कांताबीबी व्यक्त करते. गल्लीत त्याला येऊ द्यायचं नाही. याची काळजी मी घेतली आहे. त्याला माहिती झाल्यास काय होईल ? याचा विचार केला की, डोकं गरगरायला लागतं. झकपाक कपडे घालून, उंची अत्तरे लावून मोठ्या असामीचा आव आणणारी माणसांचा खरा चेहरा आमच्याकडे उघडा पडतो. सध्या पावलोपावली तुम्हाला फसविणारी माणसे असताना कुणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न तर पडतोच. मात्र अशावेळी अनिलला आपलं मानून जीव लावणा-या त्या कुटूंबाचे आभार मानावेसे वाटतात.

पुढे त्या सांगतात की, आमचं तर आयुष्य अशा धंद्यात गेलं. आता हाताशी थोडी वर्ष राहिली. तेवढं जगायचं आणि मग मरुन जायचं. कोणं विचारणारं आहे आम्हाला? अनिलला नेहमी सांगते की, दोन पैसे मिळवं ते साठवत जा. त्याचा वापर जपून करत जा. शेवटी तेच कामाला येतात. तुमचे काम चांगले असेल तर जग सलाम करते. दुनिया बदमाश आहे. असा सल्ला ज्यावेळी त्याला भेटते तेव्हा हमखास देते. याची आठवण कांताबीबी आवर्जुन करुन देतात.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments