कोल्हापूर जिल्ह्यातील एक सधन तालुका म्हणून गडहिंग्लज तालुक्याची वेगळी ओळख आहे.हिरण्यकेशी नदीच्या पाण्याने सुजलाम सुफलाम झालेला हा तालुका जिल्यातील प्रमुख तालुका होय.शिवशाहीतील अनेक महत्वाच्या घडामोडी या तालुक्याने पाहिल्या आहेत.शिलाहार राजा भोजच्या काळात बांधलेला सामानगड हा किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो.स्वराज्याचा सेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाने या तालुक्याची भूमी पवित्र झाली आहे,काळभैरव हे ग्राम दैवत असलेल्या गडहिंग्लज तालुक्यात नेसरी,हलकर्णी,नूल,भडगाव,महागाव,गिजवणे,अशा अनेक महत्वाच्या गावांचा समावेश होतो.एक नगरपालिक, पंचायत समिती, कृषीउत्त्पन्न समिती यासह महत्वाची शासकीय कार्यालये या तालुक्यात आहेत. शासकीय उप जिल्हारुग्नालय असल्याने तालुक्यातील जनतेला उपचारासाठी जिल्ह्याची वाट धरावी लागत नाही,समृद्ध निसर्ग,मोठी बाजारपेठ.नलवडे साखर कारखना,यामुळे गडहिंग्लज जिल्ह्यातील महत्वाचे ठाणे आहे .
या तालुक्याच्या राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक,पटलावर घडणाऱ्या विधायक प्रतिबिंब आपल्याला या वार्तापत्रात पाहायला मिळेल.
जाज्वल्य इतिहासाचा मूक साक्षीदार गिरीदुर्ग किल्ले सामानगड
कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज हा तालुका हिरव्याकंच वनराईन नटलेला असाच आहे.हिरण्यकेशी नदीच्या पाण्याने सुजलाम झालेली ही भूमी लढवय्या गडकऱ्यांची भूमी म्हणून ओळखली जाते . सामानगड हा माध्यम श्रेणीचा गिरीदुर्ग ही या तालुक्याची ओळख आहे.समुद्रसपाटीपासून सुमारे ३००० फुट उंच असलेला हा किल्ला महाराष्ट्रच्या दक्षिण सीमेवर जगता पहारा ठेवण्यासाठी उपयुक्त असल्याचा उल्लेख शिवशाहीत सापडतो.
कोल्हापूर जिल्हयाच्या दक्षिणेस राखणदाराच्या रुपात किल्ले सामानगड उभा आहे विशाळगड, पन्हाळा, भुदरगड, रांगणा इत्यादी लढाऊ किल्ल्याच्या बेचक्यात अगदी मधोमध याचे स्थान असल्याने रसद पुरवठयाच्या दृष्टीने या किल्ल्याचे शिवकाळात महत्व फार आहे. कदाचित यावरुनच या किल्ल्यास सामानगड हे नाव पडले असावे.
इतिहास:
कोल्हापूर जिल्हयातील इतर गडांप्रमाणेच सामान गड बांधणीचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा यांच्याकडे जाते. सन १६६७ मध्ये शिवरायांनी हा गड जिंकून घेतला. या किल्ल्याची किल्लेदारी अष्टप्रधान मंडळातील मातब्बर असामी व दक्षिण सुभ्याचे प्रमुख सुरनिस अण्णाजी दत्तो यांचेकडे होती. अण्णाजी दत्तो प्रभुणीकर यांनी सामानगडाच्या पुनर्बांधणीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. या भागाची सबनीसी त्यांच्याकडे होती. सन १६८८ मध्ये सामान गड मोगलांनी जिंकून घेतला. सन १७०१ पूर्वी हा गड पुन्हा मराठयांकडे आला. शहजादा बेदारबख्त याने किल्ल्यास वेढा घालून तो जिंकला व शहामीर यास किल्लेदार नेमले. सन १७०४ मध्ये मराठयांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला. या नंतर या किल्ल्याचे अधिपती करवीरकर छत्रपती होते. १८४४ मध्ये सामान गडाने इंग्रजाविरुध्द प्रथम बंडाचे निशाण फडकवले. बंडाचे नेतृत्व मुंजाप्पा कदम व इतरांनी केले. त्यांना स्थानिक लोकांनी चांगली साथ दिली. या बंडात ३५० गडकरी, १० तोफा, १०० बंदूकबारदार व २०० सैनिक होते. या शिंबदीने इंग्रजांना दोनदा परतावून लावले, परंतु शेवटी १३ ऑक्टोबर १८४४ रोजी सामानगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. त्यावेळी इंग्रजांनी तोफा लावून गडाची प्रचंड नासधूस केली.
पहाण्याची ठिकाणे:
शिवाशाहीचे सरसेनापती प्रतापराव गुर्जर यांच्या बलिदानाची साक्ष देणारा हा किल्ला अनेक वर्षं उपेक्षित राहिला आहे. जेव्हा प्रतापराव बेहलोलखान या शत्रूवर सहा मावळ्यांना घेऊन तुटून पडले होते .त्याच्या आगोदर प्रतापरावांचा तळ याच सामानगडावर होता. या किल्याचे असें एतिहासिक महत्व अधोरेखित झाले असतानाही या किल्ल्याचा पर्यटनस्थळ म्हणून म्हणावा तितका विकास झालेला नाही .माजी आ.बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नातून किल्याचा होदाबहुत विकास झाल्याचे आढळते.दुर्लक्षित असलेला पण निसर्गरम्य असा किल्ला पहायचा असल्यास सुरुवातीला कोल्हापुरात यावे लागेल.पुणे बेंगलोर महामार्गावरील संकेश्वर या गावावरुनही येथे जाता येते.
गडहिंग्लजवरुन भडगाव चिंचेवाडी मार्गे आपण गडाच्या पठारावर पायउतार व्हायचे. चिंचेवाडी गावातील भल्यामोठया विहिरीच्या बाजूला असलेल्या २ फिरंगी तोफा गावाच्या ऐतिहासिकतेची साक्ष देतात. डाव्या हाताची डांबरी सडक गडावर जाते. तर उजव्या हाताची सडक मारुती मंदिराकडे जाते.डाव्या बाजूच्या सडकेने आपण गडावर प्रवेश करायचा. या ठिकाणी पूर्वी दरवाजा होता, परंतु तो काळाच्या ओघात नामशेष झालेला आहे. सामानगडाच्या सर्व बाजूंनी कातळ तासून काढलेला आहे. त्यावर तटबंदी असून जागोजागी बुरुज बांधलेले आहेत.
गडावरील डांबरी सडकेच्या डाव्या बाजूने आपण गडाच्या तटावर जायचे व तटावरुनच निशाण बुरुजाकडे जायचे. येथून पुढे उजव्या हाताने पुढे गेल्यावर आपण जांभ्या दगडात खोदून काढलेल्या विहिरीवर पोहोचतो. विहिरीत उतरण्यासाठी पायर्या् आहेत. विहिर चौकोनी आकाराची आहे. विहिरीजवळून पुर्व दिशेला गेल्यावर अंबाबाईचे कौलारु मंदिर लागते. मंदिराला लागून बुजलेली पाण्याची टाकी व अनेक चौथरे आहेत.



