सातारा: सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदासाठी जिल्हा प्रतिनिधींमधून एकही जण इच्छुक नसल्याने विद्यमान जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
येत्या दोन चार दिवसांत याबाबतची घोषणाही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या जिल्हा प्रतिनिधींची बैठक नुकतीच पक्ष निरीक्षक सुरेश घुले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यातील राष्ट्रवादी भवनात झाली. या बैठकीत त्यांना सर्वांनी सुनील माने यांचे काम चांगले आहे. आमच्या पैकी कोणीही जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले होते. त्यानुसार घुले यांनी सुनील माने व्यतिरिक्त अन्य कोणीही जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नसल्याचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठविला आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सुनील माने यांचीच वर्णी लागणार हे निश्चित आहे. येत्या दोन चार दिवसांत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे.
सुरेश घुले यांना आपण कार्याध्यक्ष किंवा वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुधीर धुमाळ यांनी कळविले आहे. परंतू पक्षात कार्याध्यक्ष हे पद नाही. तर वरिष्ठ उपाध्यक्ष पद हे जिल्हाध्यक्षच निवडतो. त्यामुळे जिल्हाध्यक्ष निवडीनंतरच याबाबतची सूचना जिल्हाध्यक्षांना केली जाईल, असे आमदार घुले यांनी श्री. धुमाळ यांना सांगितले आहे.



