छत्रपती शिवाजीमहाराज शाही घराण्यातर्फे आयोजित केल्या गेलेल्या राजधानी महोत्सवाच्या पहिल्या पोस्टरचे उदघाटन राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारत मुख्य पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
मंत्रालयात आज मुख्यमंत्रांनी राजधानी महोत्सवाच्या सर्व कार्यक्रम आणि तयारीची माहिती घेतली, 25 ते 27 मे दरम्यान आयोजित या महोत्सवाचे आयोजक पंकज चव्हाण यांनी या संपूर्ण संकल्पनेची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली, नेटक्या आणि भव्य आयोजनामुळे हा महोत्सव महाराष्ट्रात सर्वात वेगळा ठरेल असे उदगार मुख्यमंत्र्यांनी त्यानंतर काढले, यावेळी महोत्सवाच्या पहिल्या पोस्टरचे लॉंचिंग त्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी खासदार मा श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना महोत्सवासाठी निमंत्रण देण्यात आले, निमंत्रण पत्रिका स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी महोत्सवातील मुख्य अशा 27 मे रोजी सायंकाळी होणाऱ्या मान्यवरांच्या पुरस्कार वितरण समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. याबाबत निश्चित कार्यक्रम मुख्यमंत्री कार्यालयातून अधिकृतपणे कळवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यासोबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री मदन येरावार, खासदार संजय पाटील हे सुद्धा यावेळी उपस्थित होते, त्यांनीही या भव्य कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल दाद देत, विविध कार्यक्रमास येण्याचे आश्वासन दिले, यासर्व मान्यवरांनी आयोजक पंकज चव्हाण आणि सहकाऱ्यांचे राजधानी महोत्सवाच्या कल्पक आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या..