Tuesday, March 31, 2026
HomeMain News८२ वर्षीय वृद्धेची २५ वर्षांपासूनची जटा मुक्त; जटामुक्ती मोहिमेचा १३८वा यशस्वी उपक्रम

८२ वर्षीय वृद्धेची २५ वर्षांपासूनची जटा मुक्त; जटामुक्ती मोहिमेचा १३८वा यशस्वी उपक्रम

दोड्डी (ता. दक्षिण सोलापूर) – अंधश्रद्धा, अज्ञान आणि स्वच्छतेअभावी केसांत तयार झालेल्या जटांमुळे त्रस्त असलेल्या ८२ वर्षीय श्रीमती पद्माबाई सिद्धू सावळे यांची अखेर जटा यशस्वीपणे सोडवण्यात आली. शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी तामलवाडी (जि. धाराशिव) येथे हा जटामुक्ती उपक्रम पार पडला.

सुमारे २५ वर्षांपासून त्यांच्या केसांत जटा तयार झाल्या होत्या. पाच फुटांहून अधिक लांबीच्या आणि सुमारे ७ ते ८ किलो वजनाच्या या जटांमुळे त्यांना मोठा शारीरिक त्रास सहन करावा लागत होता. वयोमान आणि डोक्याच्या त्वचेची नाजूक स्थिती लक्षात घेता, संपूर्ण गुंता सोडवण्याऐवजी कमी त्रास होईल अशा पद्धतीने केस कापून जटा निर्मूलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

जटांमधील गुंता सोडवून केस दोन वेळा शॅम्पूने स्वच्छ धुतले. मृत आणि तुटलेले केस वेगळे करण्यात आले, तर जिवंत केस व्यवस्थित सोडवून ठेवण्यात आले. विशेष म्हणजे, जटांमध्ये बुरशी किंवा मोठ्या प्रमाणात घाण आढळली नाही, मात्र दीर्घकाळ स्वच्छतेचा अभाव असल्याने जटा वाढत गेल्याचे स्पष्ट झाले.

श्रीमती सावळे यांना चार मुली आणि चार मुले असून, मुलींनी पुढाकार घेत आईची मानसिक तयारी करून घेतली. सातारा येथील त्यांची मुलगी भाग्यश्री माळी यांना जटा सोडवण्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी डॉ. सुधीर कुंभार यांच्याशी संपर्क साधला. सर्व कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.

डॉ. सुधीर कुंभार आणि जटामुक्ती कार्यकर्ते अलकेश ओहळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. जटा सोडवल्यानंतर श्रीमती सावळे यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसून आला. डोकेदुखी, पाठदुखी यांसारख्या त्रासांपासून त्यांना दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या उपक्रमात भाग्यश्री माळी, अनिता कोरे, शिलवंती बाशिंगे तसेच नवनाथ माळी, पांडुरंग बाशिंगे आणि कल्लाप्पा सावळे यांनी सहकार्य केले.

जटामुक्ती मोहिमेअंतर्गत डॉ. कुंभार यांनी आतापर्यंत १३८ महिलांची जटा सोडवून त्यांना शारीरिक व मानसिक त्रासातून मुक्त केले आहे. पुढेही अशा जटाधारी महिलांचे समुपदेशन करून त्यांना जटामुक्त करण्याचा संकल्प संबंधित कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments