भारतीय शिक्षणाच्या इतिहासात महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे स्थान केवळ “पहिले शिक्षक” म्हणून मर्यादित नाही; ते आधुनिक, मुक्तीवादी आणि शोषिताभिमुख शिक्षणतत्त्वज्ञानाचे शिल्पकार होते. साऊ जोतींनी सुरू केलेल्या शाळांचे वैशिष्ट्य हे होते की त्या केवळ अक्षरओळख करून देणाऱ्या संस्था नव्हत्या, तर विद्यार्थ्यांमध्ये critical thinking आणि critical consciousness निर्माण करणाऱ्या प्रयोगशाळा होत्या. आज ज्याला आपण प्रगत शिक्षणशास्त्र म्हणतो, ते विचार साऊ जोतींनी १९व्या शतकात प्रत्यक्ष अमलात आणले होते.
सावित्रीबाईंच्या शिक्षणप्रणालीचा केंद्रबिंदू हा “विद्यार्थी” होता—त्याची सामाजिक पार्श्वभूमी, आर्थिक परिस्थिती, मानसिक अवस्था आणि मूलभूत गरजा. शिक्षण हे केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे साधन नसून, शोषणाविरुद्ध उभे राहण्याची जाणीव निर्माण करणारे हत्यार आहे, ही जाणीव साऊ जोतींना पूर्णपणे होती. त्यामुळेच त्यांच्या शाळांमध्ये शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया होती.
मुक्ता साळवे आणि तिचा प्रसिद्ध निबंध हे या प्रयोगाचे सर्वश्रुत उदाहरण आहे. त्या निबंधातून एका अस्पृश्य मुलीची सामाजिक जाणीव, प्रश्न विचारण्याची ताकद आणि अन्यायाविरुद्धची भूमिका स्पष्ट दिसते. पण मुक्ता साळवे ही एखादी अपवादात्मक प्रतिभा नव्हती; ती साऊ जोतींच्या शैक्षणिक प्रयोगाची फलश्रुती होती. त्या प्रयोगात अनेक अशी उदाहरणे होती, जी आजही आपल्याला अंतर्मुख करतात.
उदाहरणार्थ, साऊ जोतींच्या वाचनप्रेरणेमुळे एका मुलीने रात्रभर दिव्याखाली बसून वाचन केले आणि अतीश्रमामुळे तिचे डोळे सुजले, अशी नोंद आढळते. ही घटना केवळ अतीउत्साहाची नाही, तर त्या काळात शिक्षणाची लागलेली भूक दर्शवते. शतकानुशतके ज्ञानापासून दूर ठेवलेल्या वर्गाला जेव्हा वाचनाची दारे उघडली, तेव्हा ज्ञान हे त्यांच्यासाठी मुक्तीचे साधन बनले.
एका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मुलीला बक्षीस म्हणून साडी किंवा लुगडे देण्याची प्रथा होती. पण त्या मुलीने त्या ऐवजी “ग्रंथालय” मागितले. हा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण तो दाखवतो की साऊ जोतींच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये तात्कालिक बक्षिसांपेक्षा दीर्घकालीन ज्ञानाचे महत्त्व रुजले होते. ग्रंथालयाची मागणी करणे म्हणजे शिक्षणाला सामूहिक संपत्ती मानणे—ही जाणीव सहज निर्माण होत नाही.
साऊ जोतींच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे निरीक्षण आणि अनुमान. एका ठिकाणी असे लक्षात आले की सवर्ण मुलींच्या तुलनेत अस्पृश्य मुली अभ्यासात मागे पडत आहेत. आजच्या व्यवस्थेत असे झाले असते तर त्याला “क्षमता कमी आहे” असे सरधोपट लेबल लावले गेले असते. पण सावित्रीबाईंनी तसे केले नाही. त्यांनी कारणे शोधायला सुरुवात केली—घरची परिस्थिती, उपासमार, कपड्यांचा अभाव, कामाचा ताण, सामाजिक अपमान.
त्या कारणांवर उपाय म्हणून त्यांनी स्वतःच्या खर्चातून विद्यार्थ्यांना कपडे, पुस्तकं, पाट्या आणि जेवण देण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर, शाळेत येणाऱ्या मुलामुलींना stipend सुरू केला. यामागील विचार अतिशय प्रगत होता. मुलं शाळेत गेल्यामुळे आई-वडिलांचे रोजंदारीचे नुकसान होऊ नये, ही सामाजिक वास्तवाची जाणीव साऊ जोतींना होती. शिक्षण हे गरीब कुटुंबांसाठी ओझं ठरू नये, तर आधार बनावं, हा त्यांचा दृष्टिकोन होता.
या शाळांमध्ये सवर्ण विद्यार्थ्यांव्यतिरिक्त सुमारे १५० मुले आणि १०० मुली—त्या काळात “अस्पृश्य” मानल्या जाणाऱ्या समाजातील—शिकत होत्या. एक दिवस या सर्व विद्यार्थ्यांनी जोतिबांसमोर ग्रंथालयाचा हट्ट धरला. अस्पृश्य विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाची मागणी करणे ही घटना फुले दाम्पत्यांसाठी भावनिक आणि वैचारिक समाधान देणारी होती. कारण ज्ञानावर हक्क सांगणारी पिढी घडते आहे, हे त्यांना स्पष्ट दिसत होते.
“मुलांच्या प्राथमिक गरजा पूर्ण केल्या, तर त्यांची मने आपोआप अभ्यासाकडे वळतात”—हे साऊ जोतींचे अनुमान त्यांनी प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवले. जेव्हा अन्न, वस्त्र, सन्मान आणि सुरक्षितता मिळाली, तेव्हा अस्पृश्य मुली सवर्ण मुलींप्रमाणेच अभ्यासात प्रगत होऊ लागल्या. ही गोष्ट आजच्या शिक्षणव्यवस्थेसाठीही एक मोठा धडा आहे.
साऊ जोतींची ही संपूर्ण भूमिका म्हणजे एक सुसंगत educational philosophy होती. त्यांनी शिक्षणाला केवळ माहिती देणारी प्रक्रिया न मानता, critical consciousness निर्माण करणारे साधन मानले. विद्यार्थ्यांनी “आपण कोण आहोत, आपली अवस्था अशी का आहे, आणि ती बदलण्यासाठी काय करायला हवे” हे प्रश्न विचारायला शिकले पाहिजेत, हा त्यांचा आग्रह होता.
आज जगभरात ज्याच्या नावाने शिक्षणशास्त्रात क्रांती झाली, त्या Paulo Freire यांनी लिहिलेले Pedagogy of the Oppressed हे पुस्तक प्रसिद्ध होण्याच्या कित्येक दशकांआधी साऊ जोतींनी शोषित वर्गासाठीची शैक्षणिक पद्धती प्रत्यक्षात अमलात आणली होती. Freire यांनी मांडलेली dialogue, consciousness, liberation through education ही तत्त्वे साऊ जोतींच्या कार्यात आधीच दिसून येतात.
म्हणूनच साऊ जोती फुले यांना केवळ समाजसुधारक म्हणून नव्हे, तर जागतिक दर्जाचे शिक्षणतत्त्वज्ञ म्हणून ओळखले गेले पाहिजे. त्यांच्या शिक्षणक्रांतीचा केंद्रबिंदू हा माणूस होता—त्याचा आत्मसन्मान, विचारस्वातंत्र्य आणि मुक्ती. आज जेव्हा आपण शिक्षणाच्या गुणवत्तेची चर्चा करतो, तेव्हा साऊ जोतींच्या या तत्त्वज्ञानाकडे पुन्हा पाहण्याची गरज आहे. कारण त्यांनी दाखवलेला मार्ग आजही तितकाच क्रांतिकारी आणि दिशादर्शक आहे.



