भारतीय इतिहासात काही घटना केवळ युद्ध म्हणून नोंदवल्या जात नाहीत, तर त्या सामाजिक क्रांतीची, स्वाभिमानाची आणि माणुसकीच्या लढ्याची प्रतीके ठरतात. १ जानेवारी १८१८ रोजी घडलेले भिमाकोरेगावचे ऐतिहासिक युद्ध आणि २१–२२ मार्च १९२० रोजी झालेली माणगांव परिषद या अशाच दोन घटना आहेत. या दोन्ही घटनांच्या केंद्रस्थानी एकच विचारधारा आहे—अत्याचाराविरुद्धचा संघर्ष आणि मानवमूल्यांची पुनर्स्थापना. या संघर्षाचे तेजस्वी प्रतीक म्हणजे भिमाकोरेगाव युद्धातील सर सेनापती सिद्धनाक महार आणि त्यांचे वंशज.
सर सेनापती सिद्धनाक महार हे भिमाकोरेगाव युद्धातील प्रमुख सेनानायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ५०० शूर महार योद्ध्यांची फौज होती. त्यांच्या शौर्याचा इतिहास केवळ १८१८ पुरता मर्यादित नाही, तर त्याची पार्श्वभूमी १७९५ च्या खर्डा युद्धापर्यंत जाते. या युद्धात दुसरा बाजीराव पेशवा आणि मोगल सत्तेमध्ये घनघोर लढाई झाली होती. बाजीराव पेशव्यांच्या बाजूने परशुराम भाऊ पटवर्धन हे सेनापती होते.
खर्डा युद्धाच्या वेळी एक प्रसंग घडला जो पुढील इतिहासाची दिशा बदलणारा ठरला. युद्धभूमीवर उभारलेल्या तंबूंमध्ये सिद्धनाक महारांचा तंबू परशुराम भाऊंच्या तंबूजवळ होता. काही उच्चवर्णीय योद्ध्यांनी “महार योद्ध्यांचा तंबू इथे नको” अशी तक्रार केली. त्या वेळी हिरोजी पाटणकरांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की, “ही जेवणाची पंगत नाही, युद्धभूमी आहे. आणि सिद्धनाक महारांचा पराक्रम महान आहे.”
हा अपमान सिद्धनाक महारांच्या मनात खोलवर रुतून बसला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “इतकी वर्षे आम्ही तुमच्यासाठी प्राण पणाला लावून लढलो, तरीही आम्हाला तुच्छतेने पाहिले जाते?” दुसऱ्या दिवशी जेव्हा मोगल सैन्याने परशुराम भाऊंना चारही बाजूंनी घेरले, तेव्हा सिद्धनाक महारांनी असा जबरदस्त प्रतिहल्ला केला की मोगल सैन्य गडबडून गेले. परशुराम भाऊंचे प्राण वाचवून सिद्धनाक महारांनी संपूर्ण लढ्याची जबाबदारी घेतली आणि बाजीराव पेशव्यांना विजय मिळवून दिला.
पण याच खर्डा युद्धानंतर सिद्धनाक महार आणि बाजीराव पेशवे यांच्यातील दरी वाढत गेली. पेशवाई सत्तेने महार समाजावर लादलेले अमानवी निर्बंध, अपमानास्पद अटी आणि जुलूम वाढतच गेले. सिद्धनाक महारांनी स्वतः बाजीराव पेशव्यांना भेटून विनंती केली की, “आमच्या समाजावर लादलेले निर्बंध उठवा. आम्हाला माणूस म्हणून जगू द्या. आजही आम्ही तुमच्या बाजूने लढायला तयार आहोत.”
परंतु बाजीराव पेशव्यांनी ही विनंती धुडकावून लावत अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले. “तुम्ही आमचे गुलाम आहात आणि गुलामच राहणार,” असे सांगून त्यांनी सिद्धनाक महारांचा अपमान केला. याच क्षणी इतिहासाने कलाटणी घेतली. न्याय, सन्मान आणि माणुसकीसाठी सिद्धनाक महारांनी इंग्रजांच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेतला.
१ जानेवारी १८१८ रोजी भिमाकोरेगाव येथे झालेल्या युद्धात सिद्धनाक महार आणि त्यांच्या शूर सैनिकांनी पेशवाईचा कायमचा अंत केला. हा विजय केवळ एका सत्तेचा पराभव नव्हता, तर हजारो वर्षांच्या सामाजिक गुलामगिरीविरुद्धचा ऐतिहासिक विजय होता. यानंतरच महार समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळू लागला, शिक्षणाची दारे उघडली, सन्मानाने समाजात वावरण्याची संधी मिळाली.
या विजयानंतर इंग्रजांनी शनिवारवाड्यात बंदिस्त असलेल्या प्रतापराव भोसले यांची सुटका केली. प्रतापराव भोसले यांनी कृतज्ञतेपोटी सिद्धनाक महारांना इनाम मागण्यास सांगितले. तेव्हा सिद्धनाक महारांनी अत्यंत नम्रपणे उत्तर दिले—“आम्हाला आधीच कळंबी गाव इनाम मिळाले आहे. पण आमच्या समाजातील मुलांसाठी शाळा सुरू करा.” या दूरदृष्टीतूनच पुढे शिक्षणाचा प्रवाह निर्माण झाला. योगायोगाने याच शैक्षणिक परंपरेतून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.
भिमाकोरेगावइतकीच महत्त्वाची घटना म्हणजे २१ व २२ मार्च १९२० रोजी झालेली माणगांव परिषद. ही परिषद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय जीवनाची सुरुवात ठरली. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांनी या परिषदेचे आयोजन केले होते. बाबासाहेब त्या वेळी अवघे २९ वर्षांचे होते. शाहू महाराजांनी बाबासाहेबांना दलितांचे नेते म्हणून पुढे आणण्याचा ठाम निर्णय घेतला होता.
या परिषदेच्या यशासाठी शाहू महाराजांनी महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय नेत्यांसाठी शाही भोजनाचे आयोजन केले. स्वतः शाहू महाराज प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करत होते. रात्री उशिरापर्यंत ते थांबले. याच वेळी साध्या वेशातील काही मंडळी तेथे आली. शाहू महाराजांनी त्यांच्यासोबत बसून जेवण केले. नंतर वाढप्यांना कळले की ही मंडळी सर सेनापती सिद्धनाक महारांचे वंशज आहेत. शाहू महाराजांनी वाढप्यांना स्पष्ट शब्दांत समज दिली आणि इतिहासाची आठवण करून दिली.
या ऐतिहासिक माणगांव परिषदेचे स्वागताध्यक्षपद दादासाहेब (राजेसाहेब) इनामदार यांना देण्यात आले. छत्रपती शाहू महाराजांचा विश्वास होता की समाजात ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो, तेच ही परिषद यशस्वी करू शकतात. आणि हा विश्वास सार्थ ठरवत, दादासाहेब इनामदारांनी ९ ते १० हजार लोक एकत्र आणून ही परिषद ऐतिहासिक यशस्वी केली.
भिमाकोरेगावचे युद्ध आणि माणगांव परिषद—या दोन घटना केवळ भूतकाळ नाहीत, तर आजही समाजाला दिशा देणाऱ्या प्रेरणास्थळे आहेत. सर सेनापती सिद्धनाक महार आणि त्यांच्या वंशजांचा हा इतिहास म्हणजे शौर्य, स्वाभिमान, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा अखंड प्रवास आहे. हा इतिहास जपणे, सांगणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे हीच खरी इतिहाससेवा आहे



