Tuesday, March 24, 2026
HomeMain Newsआपण आशा सोडून कसं चालेल!

आपण आशा सोडून कसं चालेल!

भारताचं वेगळेपण काय? तर या देशाचे सगळे ‘फाउंडिंग फादर्स’ एकाच वेळी रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते होते आणि तितकेच विचारवंत ॲकॅडमिशियनही. गांधी, नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद — यांच्यातील हे द्वंद्व नव्हे; तर हेच त्यांचं मुकुटमणी. विचारधारा आणि कृती यांचा संगम त्यांनी घडवला. सामान्य माणसाला आपल्या लढ्याचा केंद्रबिंदू बनवले. कोणाचेच नसलेल्यांना उराशी कवटाळले. म्हणून आजचा भारत उभा आहे.

महात्मा फुल्यांचे उदाहरण पहा. ते नगरसेवक, कंत्राटदार—पण अखेरीस पुस्तक प्रसिद्ध करण्यापुरते पैसेही उरले नाहीत. कारण त्यांनी स्वतःला संपवून लोकांना दिलं. विचारवंत आणि कार्यकर्ता—या दोन्हींचं तेज त्यांच्या कामात उजळत राहिलं. पण पुढे जाताना, या दोन प्रवाहांमध्ये दरी निर्माण होत गेली. विचारवंत रस्त्यावर उतरणं बंद झालं आणि कार्यकर्ते विचार करण्यापासून दूर गेले. यामुळे लोकांच्या लढ्यांची ज्योत विझू लागली.

आज एवढं सर्व होत असतानाही लोक रस्त्यावर येत नाहीत—हा मोठा प्रश्न आहे. नव्या माध्यमांनी दिलेलं ‘ॲनस्थेशिया’ हे एक कारण. पण तेवढंच नाही. आजची व्यवस्था जुन्या व्यवस्थेकडून शिकली आहे—विशेषतः आक्रोश उभाच राहू नये अशा पद्धतीने होणारं शोषण. भांडवली साखळीतून, माध्यम-साखळीतून आणि राजकीय नेक्ससमधून एक भयंकर जग तयार झालं आहे—शोषण, विषमता, विखार, भीती, वेदना. पण तरीही पाण्यात तरंग पडत नाही; लोक शांत आहेत.

गावागावात तरुण बिनलग्नाचे. बेरोजगारी आकाशाला भिडलेली. पीएचडी मुलं दहा-बारा हजारांत काम करत आहेत. शिष्यवृत्ती वर्षानुवर्षे अडकलेल्या. शेती मोडून पडलेली. पावसाने गावं उद्ध्वस्त होतात. शहरांची अवस्था अतिशय बिकट. जाती-धर्मांच्या भांडणांत देशाची होरपळ. संविधानाचं संरक्षण करण्याचा अधिकार असणारीच यंत्रणा संविधानावर आघात करते. या सर्वांना पाहूनही जनआंदोलन उठत नाही.

पण या सगळ्यामागे कारण दहशत नाही; मोठं कारण विश्वास आहे. लोकांनी कोणावर विश्वास ठेवावा? कोणाच्या मागे उभं राहावं? कोण त्यांच्या दु:खात उतरेल?
एकेकाळी ट्रम्प-पुतिनपेक्षा भयंकर हिटलर-मुसोलिनी होते. तरी त्या काळातही भारताने गांधींना स्वीकारलं. एका गांधीने हाक दिली आणि लाखो सामान्य माणसं रस्त्यावर उतरली. एका भीमरावांनी आवाज दिला आणि जनसागर त्यांच्या मागे उभा राहिला.

आज अशी हाक देण्याची ताकद कोणाकडे आहे?
त्या अर्थानं पाहिलं, तर डॉ. बाबा आढाव हे या भूमीतले अखेरचे जननेते ठरतात. ते केवळ विचारवंत नव्हते, केवळ कार्यकर्ते नव्हते—ते दोहोंचा अद्भुत संगम होते. हमाल असोत, मोलकरीण, कचरावेचक, रिक्षाचालक, मजूर—या सर्वांना त्यांनी रस्त्यावर आणलंच, पण त्यांच्या आयुष्यात प्रकाशही आणला. संघटन, जिद्द, समर्पण—हे त्यांच्या स्वभावात होतं.

ते गांधीवादी होते, पण अडेलतट्टूपणा नव्हता. समाजवादी होते, पण पोकळ घोषणा नव्हत्या. त्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेने संघटनाचे नवे मार्ग शोधले. सांस्कृतिक राजकारणाची जाण, विचारांचा मजबूत पाया आणि फुल्यांच्या सत्यधर्माचा तेज—हे त्यांच्या कामाच्या केंद्रस्थानी होतं.

यात एक महत्त्वाचा पैलू—या सगळ्या नेत्यांमध्ये प्रसन्नता, विनोद, गोडवा आणि सौंदर्यदृष्टी होती.
नेहरूंना फुलं प्रिय, साहित्य-कलांची ओढ. बाबासाहेब व्हायोलिन वाजवणारे. गांधींचं गोड हसू आणि मिस्कीलपणा—हे सारे फक्त संघर्षाचे नव्हे, तर सौंदर्य जपणारेही होते.

बाबासाहेब आंबेडकरांनी पाथरीतील एका तरुणाने केलेल्या टीकेला दिलेलं उत्तर—हे त्यांची प्रखर विनोदबुद्धी, प्रसन्नता आणि विशालता दाखवतं. आजच्या चळवळींतला हा निखळ विनोद हरवत चालला आहे. मात्र बाबा आढावांसारख्या नेत्यांकडे ही ऊर्मि सदैव होती. त्यांच्या हातातली सोनचाफ्याची फुलं हेच त्याचं प्रतीक.

बाबा सतत काम करत राहिले. शेवटपर्यंत.
‘दुसरे स्वातंत्र्ययुद्ध सुरू झालं आहे’—हे ते सतत सांगत राहिले.
‘एक गाव – एक पाणवठा’, हमाल पंचायत, रिक्षा पंचायत—या सगळ्या चळवळींच्या पाठिशी तितक्याच ताकदीची उमेद. परंपरा जपत नवीन काळाशी संवाद साधणं—हे त्यांनी शक्य केलं.

बाबा गेले. पण ते दाखवलेली वाट अजूनही उजेड देणारी आहे.
त्या वाटेवर चालण्यासाठी —

विचारवंतांना रस्त्यावर उतरावं लागेल.
कार्यकर्त्यांना वाचावं, विचार करावा लागेल.
फेसबुकवर आंदोलन करणाऱ्यांनी जमिनीवर उतरलं पाहिजे.
आणि जमिनीवर रक्त गाळणाऱ्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरही आवाज उठवला पाहिजे.

चळवळ, संघटन, विचार, संस्कृती — हे सगळे महत्त्वाचे आहेत.
पण त्याहूनही महत्त्वाचा आहे आशेचा प्रकाश.
सोनचाफ्यासारखी उमलणारी ऊर्जा.

आजही फुलं उमलताहेत.
आजही तरुणाईमध्ये ज्वाला आहे.
आजही प्रश्नांच्या रानात उमलणारी एक आशेची कळी त्या प्रत्येकाच्या हातात आहे.

आपण आशा सोडून कसं चालेल?
ती सोडली, तर बाबांकडून काय शिकलो आपण?
त्यांच्या संपूर्ण आयुष्याने सांगितलं — काळ कठीण असला तरी मनातली उमेद कधीही विझू देऊ नये.
कारण जेव्हा आशा उमलते, तेव्हाच जनसंघर्षाचा पहिला अंक सुरू होतो.

अजूनही फुलं उमलताहेत ब्रो…
आणि जोपर्यंत ही फुलं उमलत राहतात, तोपर्यंत परिवर्तनाची खात्री जिवंत राहते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments